मुंबई : सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना केलेल्या कथित मारहाणीचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. हा लोकशाहीवर नोकरशाहीने केलेला हल्ला असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय आमदार शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी एकवटले. शिंदे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविले जात असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले. प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नसीम खान, राणे आणि नाईक या सदस्यांनी ओरोसमध्ये ४ मार्चला झालेल्या अमानुष मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला. डंपरचालक शांततेने आंदोलन करीत असताना मारहाण करणाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. मला आणि वैभव नाईक यांनाही पोलिसांनी मारहाण केल्याचे राणे म्हणाले. मस्तवाल पोलीस अधीक्षकांनी अरेरावीची सीमा गाठली, असे नाईक म्हणाले. अनेक सदस्यांचा रोष जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यावरही होता. त्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली. गेल्या आठवड्यात ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील घटनेदरम्यान, आमदार राणे आणि आमदार नाईक व त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी मारहाण केली होती. हे त्वेषाने पुढे आले आणि आम्हाला ओळखत असूनही त्यांनी मारहाण केली, असा आरोप नाईक यांनी केला. मारहाणीच्या घटनेनंतर मला इस्पितळात नेले. तेथे जिल्हा शल्य चिकित्सकांनी माझ्यावर उपचार का होऊ दिले म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना झापले. प्रचंड तणावाखाली असलेले शल्यचिकित्सक आता आयसीयुत आहेत, असे राणे म्हणाले. यानंतर दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाले. सर्वपक्षीय आमदार वेलमध्ये बसले. निलंबन झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कोकणच्या विभागीय महसूल आयुक्तांकरवी या मारहाणीची चौकशी सुरू आहे. त्यांचा अहवाल येताच जिल्हाधिकारी काय किंवा पोलीस अधीक्षक काय सर्वच दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले, पण त्यामुळे आमदारांचे समाधान झाले नाही आणि प्रचंड गदारोळ, घोषणाबाजी सुरूच राहिली. आमदारांची अशा पद्धतीने मुस्कटदाबी करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी निलंबित करा, अशी मागणी अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील यांनी केली. गदारोळात सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब झाले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात आले व त्यांनी शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची घोषणा केली. कोकण विभागीय आयुक्तांचा चौकशी अहवाल सोमवारपर्यंत येईल. त्यात दोषी असलेल्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)वैभव नाईक यांचा नीतेश राणेंवर हल्लाबोलएक आमदार जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करीत असताना आपण कार्यालयाच्या बाहेर शांतपणे आंदोलन करीत होतो, तरीही आपल्याला मारहाण करण्यात आली. मारहाण होत असतानाही आपण शेवटपर्यंत थांबून होतो, आपला बॉडीगार्ड पळून गेला, असे वैभव नाईक म्हणाले. यावर, नीतेश राणे काही सांगण्याचा प्रयत्न करीत असताना, नाईक यांनी, तुम्ही काय बोलता! तुमच्यामुळे सगळे काही झाले आहे, असा हल्लाबोल नाईक यांनी राणेंवर केला.
सिंधुदुर्गचे एसपी सक्तीच्या रजेवर
By admin | Published: March 12, 2016 1:03 AM