मालवण : मालवणातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व शहरातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांच्या संकल्पनेतून ढोलपथकाची स्थापना करण्यात आली. ढोलपथकात मालवणातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मामा वरेरकर नाट्यगृह येथे ढोलपथक प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. मालवणात प्रथमच महिलांच्या ढोलपथकाची स्थापना करण्यात आली.मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात ढोलपथक प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अनुराधा पांगम व शोभना चिंदरकर यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करून करण्यात आला.यावेळी मालवण नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती तृप्ती मयेकर, नगरसेविका ममता वराडकर, दर्शना कासवकर, शीला गिरकर, पूजा सरकारे, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर यांच्यासह संयोजक चारुशीला आचरेकर, पूनम चव्हाण, चारुशीला आढाव, श्रद्धा पेडणेकर, दीपज्योती आचरेकर, अक्षता गोसावी, रुपा कांदळकर, दीपा शिंदे, दिव्या कोचरेकर, कविता तारी, हिमानी गायकवाड, मनीषा पारकर, नेहा कोळंबकर, दीपाली वायंगणकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसंयोजक शिल्पा खोत, पूनम चव्हाण व चारुशीला आचरेकर यांनी पुढाकार घेऊन हौशी महिलांसाठी महिलांच्या ढोलपथकाची स्थापना केली. या ढोलपथक कार्यशाळेला पहिल्याच दिवशी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.
सुप्रसिद्ध ढोलवादक श्रीकांत जाधव हे महिलांना प्रशिक्षण देत असून संयोजकांनी ढोलपथकाला दानशूर व्यक्तींनी सहकार्य करून महिलांना प्रेरणा द्यावी, असे आवाहन केले. तर महिला बालकल्याण समिती सभापती तृप्ती मयेकर यांनीही ढोलपथकातील महिलांचे कौतुक करताना पालिकेच्यावतीने सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले.