मालवण : शहरातील बांगीवाडा येथील सफाई कामगारांच्या वसाहतीतील सांडपाण्याची समस्या नगरसेवक यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागली आहे. पालिकेच्या मागासवर्गीय कल्याण निधीतून वसाहतीसह लगतच्या परिसरात सांडपाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ड्रेनेजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.याबाबत सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करीत नगरसेवक खोत यांचे आभार मानले आहेत.शहरातील बांगीवाडा येथील नगरपरिषद सफाई कामगारांची १६ खोल्यांची वसाहत आहे. ही वसाहत गेल्या काही वर्षांपासून अनेक समस्यांच्या गर्तेत आहे. प्रभाग तीनचे नगरसेवक यतीन खोत हे वसाहतीतील समस्या सोडविण्यास नेहमीच पुढाकार घेतात.बांगीवाड्यातील नागरिकांना या वसाहतीतील सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी नगरसेवक खोत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल, असा शब्द दिला.
त्यानुसार त्यांनी पालिकेकडे पाठपुरावा करून मागासवर्गीय कल्याण निधीतून सांडपाणी व्यवस्थापनाचे काम हाती घेतले. दोन्ही वसाहतींच्या मागील बाजूस दोन प्रकारची पाईपलाईन टाकून उघड्यावरच्या उद्भवलेल्या सांडपाणी समस्येला आता पूर्णविराम मिळाला आहे. सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्ण झाल्यानंतर वसाहत रहिवाशांनी खोत यांचे कौतुक केले.यावेळी शिल्पा खोत, समीर शेख, अनिकेत आचरेकर, मनोज शिरोडकर, सुधाकर कासले, मिथुन शिगले, सचिन कासले, सूर्यकांत राजापूरकर, भूषण जाधव, सखाराम हसोळकर, सुधीर आचरेकर, कृष्णा कांबळे, हंसा वाघेला, सुनीता बेग, भारत जाधव, कृष्णा जाधव, संतोष सोनगत, दीपक बेग, सीता छजलानी, सुमित हसोळकर, संकेत हासोळकर, विरेश वळंजू, वैभव वळंजू, मेघा जाधव, अश्विनी जाधव आदी उपस्थित होते.आम्ही गेली कित्येक वर्षे सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक आणि पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र आम्हांला वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सांडपाणी समस्येमुळे आरोग्य धोक्यात होतेच शिवाय त्या पाण्यातील किडे, जंतूही खोल्यांमध्ये शिरकाव करत असायचे.
याबाबत आम्ही नगरसेवक यतीन खोत यांच्याकडे ही समस्या सोडविण्यासाठी मागणी केली. त्यांनी आम्हांला दिलेल्या आश्वासनांप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन करत काम पूर्ण करून देत आमची समस्या मार्गी लावली आहे. असे सांगत रहिवाशांनी पालिकेवर नाराजी व्यक्त केली.१५ वसाहतीतील विहिरीच्या देखभाल व डागडुजीचे काम लवकरच हाती घेतले जाईल, असे यतीन खोत यांनी सांगताना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, , बांधकाम सभापती सेजल परब, आवेक्षक सुधाकर पाटकर यांचेही यतीन खोत यांनी आभार मानले.
नाट्यगृह परिसरात सांडपाणी प्रक्रिया टाकीबांगीवाडा येथील वसाहतीतील सांडपाण्याची समस्या सोडवताना या पाण्याचा पुन्हा वापर करण्यात यावा, यासाठी नाट्यगृह परिसरात सांडपाणी प्रक्रिया टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतील साचलेल्या पाण्यावर शुद्धीकरण केले जाणार आहे. झाडांना शिंपण्यासाठी, वाहने धुण्यासाठी तसेच अग्निशमन बंबासाठी या पाण्याचा वापर केला जाणार आहे, असे यतीन खोत यांनी यावेळी स्पष्ट केले.