मालवण : मालवणात सध्या १३२/३३ केव्ही लाईन ही कुडाळ आणि कणकवलीपर्यंत आहे. ती कुडाळवरून मालवणला आणल्यास वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न सुटू शकतो. यासाठी कुडाळ ते मालवण ही १३२/३३ केव्ही लाईन मनोऱ्याच्या माध्यमातून मालवणपर्यंत आणून उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.शहरातील विविध विकासकामांसाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यात मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, नगरविकास राज्यमंत्री, बांधकाम मंत्री यांच्या भेटी घेऊन विविध निवेदने सादर करीत निधीची मागणी केल्याचे सांगितले.वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून यासाठी आवश्यक उपाययोजना झालेल्या नाहीत. कारण येथे जी ३३ केव्ही लाईन आली आहे ती कुडाळवरून आणि जंगलमय भागातून जाते. त्यामुळे कुठेही काही बिघाड झाल्यास ३३ किलोमीटर लाईन आणि साधारण २५० विद्युत खांबांची तपासणी करावी लागते. त्यामुळे वारंवार वीजप्रवाह खंडित होणे, खंडित झालेला वीजप्रवाह सुरळीत करण्यास विलंब होतो.
ज्या विद्युत खांबांवरून वीजवाहिन्या ओढल्या आहेत त्यातील बरेच विद्युत खांब मोडकळीस आले आहेत. यामुळे सुरक्षित विद्युत व्यवस्था असणे आवश्यक आहे, असे कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.पालिकेने रॉकगार्डन विकसित केले असून तेथे पर्यटक भेटी देतात. या गार्डनच्या समोरील जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. ही जागा समतल नसून याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत स्टॉल्सची उभारणी झाली आहे.
त्यामुळे बकालपणा आला आहे. त्यामुळे ही जागा पालिकेस उपलब्ध करून दिल्यास पालिकेच्यावतीने तेथे म्युझिकल फाऊंटेन उभारले जाईल. यासाठी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत ही जागा पालिकेस द्यावी अशी मागणी केली आहे.शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पालिकेस विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.