सिंधुदुर्गनगरी : कोकणामध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंमधील सुप्त गुणांची पारख करीत क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारण्याची सक्षमता निर्माण करावी व क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याची यशाची कमान उंचवावी, असे आवाहन शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग खेळाडू व तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिरात ओंकार ओतारी उद्घाटक म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की, मी स्वत: खेळाडू तर आहेच, याशिवाय माझ्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेते, छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू तयार झाले आहेत. कोकणामध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही फार काटक, चिवट, गुणी व मोठी क्षमता असलेले खेळाडू आहेत.
या शिबिरात दिले जाणारे क्रीडा कौशल्य व तंत्र, आधुनिक नियमांच्या अद्ययावत ज्ञानाचा वापर करून शिक्षकाने सतत कार्यशील व अपडेट रहायला हवे. तरच तुमच्या हातून अनेक उत्कृष्ट व सक्षम खेळाडू घडतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. क्रीडा शिक्षकाने सतत अपडेट राहण्याचेही त्यांनी यावेळी आवाहन केले.यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा अधिकारी सचिन निकम, उदय पवार , विलास देशमुख तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक अजय सावंत, विश्वनाथ सावंत, बयाजी बुराण, सुनिल भाटवडेकर, खंडवी, जोफळे तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू माधुरी खराडे आदी मान्यवर उपस्थित होते. ५ एप्रिल दरम्यान दहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे सुरू आहे.या शिबिराचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाले. या शिबिरात उपस्थित क्रीडा शिक्षकांना निवडक मास्टर ट्रेनर यांच्याकडून खेळातील अद्ययावत क्रीडा कौशल्य व नवनवीन नियमांची माहिती देण्यात येणार आहे. हे शिबिर निवासी असून क्रीडा शिक्षकांची निवास व भोजनाची व्यवस्था या कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे.तसेच प्रशिक्षणार्थींना कार्यालयाकडून ट्रॅकसूटचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ सावंत यांनी केले व आभार क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी मानले. या शिबिरात विविध तालुक्यातील क्रीडा शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले आहेत.क्रीडा शिक्षक आत्माजिल्हा क्रीडाअधिकारी किरण बोरवडेकर म्हणाले की, क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. त्यामुळे क्रीडा शिक्षकाचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी १२ व्या क्रीडा धोरणानुसार खेळाचा प्रसार व प्रचार करीत क्रीडा शिक्षकांना त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी हे प्रशिक्षण असल्याचा उद्देश त्यांनी विशद केला. शाळेतील खेळाडूंना घडविण्यासाठी व क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात शिवछत्रपती पुरस्कार विजेते ओंकार ओतारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोबत क्रीडाधिकारी बोरवडेकर आदी उपस्थित होते.