कणकवली : तालुक्यातील कासार्डे परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू व्यवसाय सुरु असून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
यामुळे धुळीचे साम्राज्य पसरून शाळकरी मुलांना तसेच रहिवाशांच्या आरोग्यास धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या ठिकाणचा वाळू व्यवसाय बंद व्हावा, अशी मागणी अवैध धंदेविरोधी समिती सदस्य संजय नकाशे यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रातांधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे केली आहे.यावेळी अवैध धंदे विरोधी समिती सदस्य संजय नकाशे, गोट्या पाताडे, दीपक शिर्सेकर, रुपेश कानसे, संतोष कानडे, अभिजित शेट्ये, सागर शिर्सेकर, पप्या लाड आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासार्डे परिसरातील नागरिकांच्या वस्तीच्या ठिकाणी वाळू व्यवसाय सुरु असल्याने नागरिकांना तसेच शाळेतील मुलांना रस्त्यावरून ये-जा करताना धुळीशी सामाना करावा लागत आहे.
या वाळू वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. आपला वाळू व्यवसायास विरोध नसून नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे हा व्यवसाय नागरिकांच्या वस्तीपासून दूर ठिकाणी असलेल्या ठिकाणी करावा असेही यात म्हटले आहे.
अन्यथा पाच दिवसांनंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणारसध्या वाळू उपशावर बंदी असून कासार्डे येथील या वाळू व्यवसायासाठी प्रशासनाकडून कशाप्रकारे व कोणत्या प्रकारची परवानगी दिली आहे. याचा खुलासा करावा.
यावर गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कारवाई होऊन हे व्यवसाय बंद करावेत. अन्यथा, पाच दिवसानंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्यावतीने उपोषण छेडले जाईल, असा इशाराही यावेळी २८ ग्रामस्थांच्या सह्यांसह प्रांताधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.