सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.
मंगळवारपासून राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सावंतवाडीतून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची येथील मँगो हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, धीरज परब, वाहतूक सेना प्रमुख संजय नाईक, सिंधुदुर्ग वाहतूक सेनाप्रमुख राजू कासकर आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांती आणण्यासाठी गेल्या सत्तर वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तर वेगळे चित्र दिसून येईल. सिंधुदुर्गमधील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे.
तरुण नोकरीसाठी महानगराच्या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जिल्ह्यात व्यापार-उद्योगांबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या असून, मनसेच्यावतीने प्रयत्न करावेत. काही शहरात थोड्याफार प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली आहेत. शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता.पण गेल्या पंचवीस वर्षांत मूलभूत सुविधांशिवाय पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प नकोत ही येथील लोकांची भावना बरोबर आहे. पण इतर अनेक प्रकल्प आहेत जे या जिल्ह्यात उभे राहू शकतात. नोकऱ्यांसाठी रोजगार मेळावे, शिबिरे, मुलाखती होतात, पण नोकऱ्या नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे.साळगावकर यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात हजारो एकर पडीक जमीन आहे. पण या ठिकाणी औद्योगिकीकरण होऊ शकले नाही. त्यासाठी ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे तसेच शेजारील गोवा राज्याची प्रगती औद्योगिकीकरणामुळे झाली आहे. तेथील राजकीय शक्ती यासाठी प्रबळ आहे. मात्र येथे होऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध होतो. यामागचे कारण काय, त्याचे समाधान कशात आहे, याची चर्चा सर्व स्तरावर होणे आवश्यक आहे.