दोडामार्ग : शासनाने एक तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हांला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
हत्तींकडून सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे हेवाळे-राणेवाडीतील शेतकऱ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. बँकांची कर्जे काढून येथील बेरोजगार युवकांनी मोठ्या आशेने उभ्या केलेल्या केळी बागायती हत्ती उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तिलारी खोऱ्यांत वास्तव्यास असलेल्या जंगली हत्तींनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. तिलारी खोऱ्यातील आयनोडे, हेवाळे, बाबरवाडी, विजघर व या परिसराला लागून असलेल्या घोटगेवाडी, सोनावल, पाळये गावातील भातशेती, केळी व माड बागायती हत्तींच्या कळपाने एका रात्रीत उद्ध्वस्त केली.
त्यामुळे बळीराजा हत्ती उपद्रवामुळे मेटाकुटीस आला आहे. वनविभाग मात्र हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याचे सोडून कुचकामी ठरलेल्या तकलादू उपाययोजना राबविण्यात व्यस्त आहे. मात्र, त्याचा कोणताही परिणाम हत्तींवर होत नसल्याने शेतकऱ्यांचे हत्तींकडून होणारे नुकसानसत्र मात्र सुरूच आहे.सध्या हत्तींचा कळप हेवाळे-राणेवाडी परिसरात तळ ठोकून आहे. रात्रीच्यावेळी बागायतीत घुसून केळी बागायतींचा फडशा पाडण्याचे सत्र सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.हेवाळे-राणेवाडीतील सिद्धेश राणे, दत्ताराम देसाई तसेच अन्य बेरोजगार युवकांनी बँकांची कर्जे काढून केळी बागायती फुलविल्या आहेत. अपार मेहनतीनंतर या बागायतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह होणार होता. मात्र, याच बागायती हत्तींनी पायदळी तुडविल्याने त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.
दोन दिवसांपूर्वी अडीच हजार केळी हत्तींनी भुईसपाट केल्यानंतर शनिवारी रात्री उर्वरित बागायतीतही घुसून हत्तींच्या कळपाने लाखो रुपयांचे नुकसान केले.
वनविभागाने तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करावा किंवा हत्तीपकड मोहीम राबवावी, अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे कानाडोळा झाल्याने हत्तींकडून नुकसान सुरूच आहे.
परिणामी कर्जाचे हप्ते फेडावेत तरी कसे? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे सरकारने एक तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, नाहीतर आम्हांला आत्महत्या करण्यास परवानगी तरी द्यावी, अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत.मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडेहत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता थेट साकडे घातले आहेत. त्यांना याबाबत पत्र लिहिले असून, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नीतेश राणे यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.हत्तींच्या उपद्रवाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशीच झाली आहे. कायमस्वरुपी हत्ती बंदोबस्तासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याने नुकसान सत्र सुरुच आहे. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.