सिंधुदुर्गनगरी : १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या अनुयायी जमावावर हल्ला करून दंगल घडविणाऱ्या दंगलखोरांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी बुधवारी बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी बसपा जिल्हाध्यक्ष रवींद्र कसालकर, बसपा जिल्हा प्रभारी पी. के. चौकेकर, दीपक जाधव, माजी जिल्हा संघटक डॉ. एस. के. पाटणकर, प्रदेश सचिव सुधाकर माणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण ख्यामनकेरी, जिल्हा कोषाध्यक्ष एस जी विणकर, उदय जाधव, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी संपूर्ण देशातून जमले होते. गेली १९९ वर्षे महाराष्ट्रासह देशातील लाखो दलित, पददलीत, बहुजन समाज आपल्या पूर्वजनांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला शांततापूर्वक एकत्र येतात.
त्याप्रमाणे एकत्र आलेले असताना अचानक पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे अभिवादनासाठी जमलेल्या जमावावर दगड फेक, मारझोड, किंमती गाड्यांची तोडफोड, गाड्या जाळणे हा प्रकार सुरु झाला. या अचानक घडलेल्या दंगलीत राहुल फटांगळे तरुणाचा मृत्यू झाला.हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता. गावातील तीन मजली घरांच्या गच्चीवरून दगडफेक झाली. एवढे दगड तेथे आले कुठून? सुरक्षित ठेवलेल्या गाड्या फोडल्या गेल्या. याचा सिंधुदुर्ग बसपाच्यावतीने तीव्र निषेध करून या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करीत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्यावतीने हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी स्वीकारले.ओरोस फाटा येथे रास्ता रोको आंदोलनभीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाला २०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिवादन करायला लाखो अनुयायी एकत्र गोळा झाले होते. या अनुयायांवर दगडफेक झाली होती. भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
याच धर्तीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रिपाई संघटनेच्यावतीने ओरोस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रिपाईचे पदाधीकारी उपस्थित होते.