सिंधुदुर्ग : इन्सुली आरटीओ चेक पोस्ट वरून बेकायदा ओवरलोड वाहतूक होत असल्याने तेथील ग्रामस्थ व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक जण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे या ठिकाणावरूण होणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करा. अन्यथा १४ नोव्हेंबरला इन्सुली चेक पोस्ट समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निगुडे येथील महेश अंकुश सावंत यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सावंतवाडी तालुक्यातील निगडे तेलीवाडी येथील महेश सावंत यांनी आज सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात, झाराप-पत्रादेवी महामार्गावरून इन्सुली चेक पोस्ट समोरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ओवरलोड खनिज वाहतूक भरधाव वेगाने होत आहे. यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली असून रस्त्यावरील अपघातातमुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व पत्करावे लागले आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चे लक्ष वेधूनही ओवरलोड बेकायदेशीर वाहतुकीवर निर्बंध आलेला नाही. सदर तक्रारीकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक होत आहे.इन्सुली चेक पोस्ट समोरून होणाऱ्या बेकायदेशीर ओवरलोड वाहतुकीच्या मुद्द्याबाबत तहसीलदार सावंतवाडी यांचे लक्ष वेधूनही दखल घेतली जात नाही. सदर बेकायदेशीर ओवरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरची उंची तपासली जात नाही.
ओवरलोड वाहतूक होत असतानाही डंपरना वाहतूक पास देण्यात येत आहेत. त्यामुळे इन्सुली चेक पोस्टसमोर वजनाची मोजमाप करण्यासाठी शासकीय वजन काटा उभारण्यात यावा तसेच सीसीटीव्ही बसवून २४ तास तपासणी पथक तैनात करून ओवरलोड वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे