कणकवली : संविधान जाळणाऱ्यांवर व आंबेडकरविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदन देऊन केली. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पोलीस ठाण्याला भेट देऊन शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदन सादर केले.येथील बौद्धविहार येथे बौद्ध सेवा संघाचे कार्यकर्ते सकाळी मोठ्या संख्येने जमले. त्याठिकाणी विचारविनिमय करून पोलिसांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सहसचिव प्रदीप सर्पे, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष सुजित जाधव, डॉ. व्ही. जी. कदम, बौद्ध सेवा समिती मालवणचे तालुकाध्यक्ष संजय कदम, सचिन तांबे, दर्पण प्रबोधिनीचे सचिव आनंद तांबे, प्रज्ञा सर्पे, माजी नगरसेवक गौतम खुडकर, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, सिध्दार्थ तांबे, संदीप विलास कदम, सुभाष वरवडेकर, सुहास कदम, अनिकेत पवार, नरेंद्र तांबे, रवींद्र तांबे, किरण कदम, किशोर कदम, बाबुराव सावडावकर, संदीप तांबे, अशोक कांबळे, अजय तांबे, संतोष कांबळे, महेंद्र पवार, नारायण जाधव, प्रसाद जाधव, अमित जाधव, गौरव कदम, सचिन कासले आदी उपस्थित होते.दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा गुन्हा असल्याचे बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानित करणाऱ्या या समाजकंटकांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी बौध्द सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर बौध्द सेवा संघाच्या ५३ पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.