सिंधुुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे काम येत्या गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण केले जाणार आहे. चिपी विमानतळासह रत्नागिरीतील विमानतळ हे उडान योजनेंतर्गत घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. चिपीतून विमान लवकरात लवकर टेक आॅफ घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना व परवानग्यांची पूर्तता करून विमानसेवा कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी चिपी येथे पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, विमानतळाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या ठिकाणी भेट देत विमानतळाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आयआरबीचे राजेश लोणकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी जयंत डांबरे, सुशील पांडे, अमर पाटील, वेंगुर्लेचे तहसीलदार शरद गोसावी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक विकासासाठी कोकण पहिल्या टप्प्यातदेशातील सर्व जिल्ह्यांचा औद्योगिक विकास व्हावा यासाठीचे नियोजन केले होते. त्याला जोडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे पहिल्या टप्प्यात घेतले जाणार आहेत. त्याचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अॅण्ड प्रमोशन यांना काम करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.
जुन्या आठवणींना उजाळायावेळी प्रभू यांनी पॅसेंजर टर्मिनसची पाहणी केली. यावेळी चिपी विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन नारायण राणे मुख्यमंत्री व मी केंद्रीय मंत्री असताना झाले होते. त्याची कोनशिला आज पाहिली, असे सांगत प्रभू यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.