कुडाळ : येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून सहा लाख किंमतीचा खसखस आणि इतर साहित्यासह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. कुडाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.मुंबई येथून सिनियर ट्रॉन्सपोर्ट कंपनीमार्फत एका ट्रकमधून मसाले, विविध खाद्य पदार्थ, रंगाचे मोठे डबे आणि इतर माल सिंधुदुर्ग व गोवा येथे उतरविण्यासाठी रविवारी रात्री आणण्यात आला.
ट्रकमधील काही माल कुडाळ बाजारपेठेत उतरण्यात येणार होता. मात्र, कुडाळ येथे येण्यास उशीर झाल्याने माल सोमवारी सकाळी देण्याचे ठरले. त्यामुुळे चालकाने ट्रक पुढे गोव्याला न नेता कुडाळ येथील महामार्गाच्या कडेला उभा केला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चालक व क्लिनर झोपी गेले. मात्र, सोमवारी सकाळी ट्रकच्या मागील बाजुची ताडपत्री फाटलेली दिसली.
दोऱ्याही कापलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हौद्यात उतरून पाहिले असता काही माल कमी दिसला. ट्रकमधील मालाची चोरी झाल्याचे लक्षात येताच चालकाने कुडाळ पोलिसांना खबर दिली.
ट्रक कुडाळ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर केलेल्या तपासणीत खसखसची सुमारे सहा लाख रूपये किंमतीची पोती, रंगाचे दहा डबे व इतर साहित्य मिळून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.