कणकवली : आम्हांला दर ५ वर्षांनी निवडणुकीच्या परीक्षेला बसावे लागते. माझे आजपर्यंत अनेक सत्कार झाले, परंतु हा सत्कार वैश्य समाजाने केलेला असल्यामुळे तो मला महत्त्वाचा वाटतो, असे मत मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी व्यक्त केले. जात पडताळणी समितीसारखे देशात दुसरे भ्रष्ट काहीही नाही. हा आम्हांला आलेला अनुभव आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.वैश्य समाज बांधवांच्यावतीने येथील आचरेकर प्रतिष्ठान येथे मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वैश्य समाजाच्यावतीने सिंधुदुर्ग वैश्यभूषण पुरस्कार विश्वनाथ म्हाडेश्वर यांना देण्यात आला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र व पुष्पहार घालून म्हाडेश्वर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, नूतन नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, विजयानंद पेडणेकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, बाळा भिसे, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अॅड. दीपक अंधारी आदी उपस्थित होते.समाज बांधवांना मार्गदर्शन करताना विश्वनाथ म्हाडेश्वर म्हणाले की, समाजात एकी निर्माण करा. आपापसात दुश्मनी न करता सलोख्याचे संबंध ठेवा. राजकीय हेवेदावे विसरून समाजासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी काँग्रेस नगरसेवकाने राधानगरी येथे आपल्या केलेल्या सत्काराची आठवण त्यांनी करून दिली. तो कोणत्या पक्षात आहे हे महत्त्वाचे नसून तो आपल्या समाजाचा आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवा व समाजावर प्रेम करा, असे आवाहन त्यांनी केले.संदेश पारकर म्हणाले, आपण सर्वजण वैश्य समाजाचे आहोत याचे भान ठेवून काम करा. आपली मुले मोठी व्हावीत ही जिद्द बाळगा, असे सूचित केले. अॅड. दीपक अंधारी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी समीर नलावडे, नगरसेवक मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मानसी मुंज, रुपेश नार्वेकर, सुनील कोरगावकर, नितीन कोरगावकर, महेश अंधारी, बाळासाहेब बोर्डवेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, प्रदीप नारकर, गणेश कुशे यांचा विश्वनाथ म्हाडेश्वर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रमोद जठार, राजन तेली, विजयानंद पेडणेकर, संदेश पारकर, बाळा भिसे, अॅड. दीपक अंधारी यांनाही गौरविण्यात आले.