बांदा : दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी भामट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र व चेन असा ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना मडुरा गावात घडली आहे.मडुरा-परबवाडी येथील शर्मिला शांताराम शिरोडकर यांचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व मुलगी कीर्तिका शांताराम शिरोडकर हिची सुमारे ५ ग्रॅम वजनाची चेन असा एकूण सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याचा शर्मिला यांना जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविण्यात आले.हे दागिने लंपास केल्यानंतर अर्ध्या तासाच्या अवधीत पाडलोस गावातही भामट्यांनी असाच प्रकार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर त्या भामट्यांनी शिरोड्याच्या दिशेने दुचाकीवरून पळ काढला. या घटनेने मडुरा पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती शर्मिला यांचे पती शांताराम शिरोडकर यांनी बांदा पोलिसांत दिली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, शर्मिला शिरोडकर या आपल्या कुटुंबासमवेत मडगाव (गोवा) येथे राहतात. चार दिवसांपूर्वीच मडुरा- परबवाडी येथे आपल्या सासरी त्या आल्या आहेत. बुधवारी दुपारी शर्मिला या घरात आपली सासू लक्ष्मी व मुलगी कीर्तिका यांच्यासोबत होत्या. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी युवक दुचाकीवरून दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आले.
अत्यंत कमी दरात दागिने पॉलिश करून देतो असे सांगितल्याने शिरोडकर यांनी आपले मंगळसूत्र व सोन्याची चेन पॉलिश करण्यासाठी दिली. दागिने पॉलिश करताना हातचलाखी करीत चोरट्यांनी शिताफीने दागिने लंपास केले. चोरट्यांनी शिरोडकर यांच्याकडे बनावट डबी देत दागिने पॉलिश झाले असून अर्ध्या तासाने डबी उघडून दागिने घ्या, असे सांगितले व तेथून त्यांनी पोबारा केला.
शिरोडकर यांनी २० मिनिटांनंतर डबी उघडून बघितली असता त्यात दागिने नसल्याचे निदर्शनाला आले. आपण पुरते फसलो असल्याचे लक्षात येताच शिरोडकर यांनी याबाबतची कल्पना शेजाऱ्यांना दिली. स्थानिकांनी मडुरा तिठ्यापर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगात पाडलोसच्या दिशेने मार्गस्थ झाले.चोरीच्या घटनेनंतर शिरोडकर यांना जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यांना अत्यवस्थ स्थितीत तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली कासार यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी येथे हलविण्यात आले.
पाडलोसमध्येही असाच प्रकार करण्याचा प्रयत्नदुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाडलोस केणीवाडा येथील विश्वनाथ नाईक यांच्या घरी जात त्या दोन अनोळखी व्यक्तींनी दागिने पॉलिश करण्यासाठी मागितले. मात्र नाईक यांना संशय आल्याने त्यांनी नकार देत त्यांना हाकलून लावले. बांदा पोलिसांत रात्री उशिरा तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.