सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडीतील चोरीचे कॅमेरे व अन्य साहित्य खरेदी केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी रायगड येथून तीन संशयितांना ताब्यात घेत रविवारी अटक केली. दरम्यान, दोन किमती कॅमेरे, एक लॅपटॉप व एक चोरीची दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.मे महिन्यात मालवण, बांदा, कुडाळ व देवगड येथील फोटो स्टुडिओ फोडून लाखो रुपये किमतीचे कॅमेरे व अन्य साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी महेंद्र भामा अवचटकर (३४, रा. रायगड) याला अटक केली व ५ जूनपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. संशयित अवचटकर याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी रायगड वडखळ येथे गेले दोन दिवस तपास मोहीम व धाडसत्र राबविले.पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, कृष्णा केसरकर, संतोष सावंत, जॅक्सन गोन्साल्वीस यांच्यासह मालवण पोलीस अधिकारी अमोल साळुंखे तसेच मंगेश माने, विजय धुरी, सिद्धेश चिपकर हे सहभागी झाले होते.अवचटकर याने चोरी केलेले कॅमेरे व लॅपटॉप रायगड येथे विकले. हे चोरीचे साहित्य खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी निलेश शशिकांत म्हात्रे, रोहन प्रकाश पाटील (२१, दोघेही मोबाईल शॉपी चालक), व वैभव मधुकर तुरे (२१, फोटोग्राफर) या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात दोन किमती कॅमेरे, एक लॅपटॉप व एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यातील दुचाकी मुंबई येथून चोरी केल्याची माहितीही पोलिसांनी दिली.आधी मालवण पर्यटन, मग चोरीसंशयित महेंद्र अवचटकर याने मे महिन्यात मालवण येथे पहिली चोरी केली. त्याच्या आदल्या दिवशी तो मालवणात दाखल झाला. सकाळी किल्ले दर्शन केल्यानंतर त्याने चोरी केलेल्या ठिकाणांची रेकी केली. मध्यरात्री समीर फोटो स्टुडिओ फोडून चोरलेले साहित्य शेजारचे एक बंद घर फोडून त्यात ठेवले.
त्यानंतर भरड येथील पाटकर यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरून कानाला हेडफोन लावून झोपलेल्या मुलाचा मोबाईल चोरला. तसेच सर्व साहित्य चोरून सकाळी सहा वाजण्याच्या एसटी बसने पसार झाला, अशी माहिती पोलीस अधिकारी अमोल साळुंखे यांनी दिली.