सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील निसर्ग आणि येथील समुद्र किनारे हे शेजारच्या गोवा राज्यापेक्षा खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत. याचबरोबर येथील आंबा, काजू, कोकम, जांभूूळ आदी विविध फळेही सुमधुर आहेत. लोककलाही महत्त्वाच्या आहेत. मात्र, ते जगाला माहीत नाहीत. ही माहिती करून देऊन या जिल्ह्याचा पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली असून या योजनेच्या पुर्ततेसाठी या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी आम्ही केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात दाखल झालो आहोत.या सर्व विषयांचा आपण अभ्यास केला असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या प्रस्तावांना मान्यता दिली जाईल. त्याचबरोबर येथील वनसंज्ञा आणि सीआरझेड चाही प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही केंद्रीय उद्योग सह सचिव सुधांशू पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.केंद्रीय वाणिज्य, उद्योग व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध खात्यांच्या केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावून येथील निसर्ग, निसर्गदत्त फळे याचबरोबर येथील लोककला, प्रश्न, येथील साधन सामग्री क्षमता यांची पाहणी करून कोणकोणते विषय कोणकोणत्या खात्याअंतर्गत घेता येतील याबाबतची बारकाईने तपासणी केली.
यानंतर जिल्हाधिकारी दालनात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या नंतर या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पांडे यांच्यासोबत केंद्रीय हवाई सहसचिव राजिव अग्रवाल, अनिल अग्रवाल, प्रभू यांचे खासगी स्वीय सहाय्यक विजय पिंगळे, अमित भोळे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, माजी आमदार राजन तेली, भाजपा नेते अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.यावेळी सुधांशू पांडे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्टया मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो असा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अप्रतिम असा निसर्ग लाभला आहे. त्याचबरोबर येथील समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत.मासे निर्यातीकरीता प्रयत्न सुरूदक्षिण भारतात कायद्याच्या चौकटीत राहून समुद्रात किंवा किनारपट्टीवर पर्यटनदृष्टया विकास करण्यात आला आहे. याच धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सीआरझेड आणि वनसंज्ञा यातून सूट मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच त्यावर निर्णय होईल असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त करताना येथील मासे कसे निर्यात करता येईल यासाठीचा सविस्तर आराखडा तयार असून त्याला ही लवकरच मान्यता मिळेल असेही सुधांशू पांडे यांनी स्पष्ट केले.