दोडामार्ग : वझरे येथे दूरसंचार मोबाईल मनोरा उभारण्यावरून दोन गटात सुरू असलेला वाद शुक्रवारी चांगलाच उफाळून आला. मनोरा उभारण्याच्या विरोधात असलेला गट आणि समर्थक गटात पाळ, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटाचे मिळून आठ जण जखमी झाले.
अनेकांची डोकी फुटली. त्यापैकी सात जणांना म्हापसा-गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून, जमखींमध्ये दोन वृध्द महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, दोडामार्ग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
दोन्ही गटांचे प्रशासनाकडे निवेदनवझरे-काळकेकरवाडी येथे मोबाईल मनोरा प्रस्तावित आहे. सध्या या मनोऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मनोरा उभारण्यावरून दोन गटात मतभेद आहेत. विरोधात असलेल्या गटाच्या म्हणण्यानुसार लोकवस्तीत मनोरा बांधू नये. तो अन्यत्र बांधावा. तर समर्थनार्थ असलेल्या गटाची मोबाईल मनोरा गावात होणे आवश्यक असल्याने तो मंजूर जागेतच उभारला जावा, अशी भूमिका आहे.
दोन्ही गटांनी चार दिवसांपूर्वी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आपापली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यावर प्रशासनाने तोडगा न काढल्याने हा वाद दोन्ही गटांदरम्यान धुमसत होता. अखेर शुक्रवारी हा वाद उफाळून आला.मोबाईल मनोरा उभारण्याच्या विरोधात असणाऱ्या गटातील एका युवकाने समर्थनार्थ असणाऱ्या गटातील एका युवकाला व्हॉटस्अपच्या माध्यमातून मारण्याची धमकी दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी समर्थक गटातील ग्रामस्थ गेले असता विरोधी गटातील ग्रामस्थांनी पाळ, कोयत्याने त्यांना मारहाण करण्यास सुरूवात झाली.
या मारामारीत अनेकांची डोकी फु टली. आणि दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले. त्यापैकी रमेश बाबणी काळकेकर (३०), घन:शाम बुधाजी काळकेकर (४९), आनंदी आनंद उसपकर (६०), दशरथ ढोकळा गवस (६५), गोपी महादेव गवस (४०), प्रितम दशरथ गवस (३०), शुभम गोपी गवस (२४) या सात जणांच्या डोके व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना म्हापसा-गोवा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तर कौशल्या दशरथ गवस (५५) यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.