सिंधुदुर्ग : विजांच्या कडकडाटात सायंकाळी चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यात दाणादाण उडवून दिली. त्यामध्ये इमारतींच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तासभर ठप्प झाला होता. तर वैभववाडी शहरात तीन ठिकाणी वीजेचे खांब मोडून पडले.
काही घरे व दुकानांवर झाडांच्या फांद्या पडून नुकसान झाले. सुदैवाने कुठेही जिवीतहानी झाली नाही. मात्र नावळेत घराचे छप्पर कोसळून दोघेजण किरकोळ जखमी झाले. वादळी पावसाला सुरुवात होताच खंडीत झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पुर्ववत झाला नव्हता.दुपारी तीनपासून सह्याद्री पट्ट्यात पावसाचे वातावरण तयार झाले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास चक्रिवादळासह मुसळधार पाऊस सुरु होताच शहरात एकच तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे अक्षरश: धडकी भरली होती.
अर्जुन रावराणे विद्यालयासमोर वीजवाहीन्यांवर झाड कोसळले. तसेच कोकिसरे नारकरवाडी, नाधवडे येथे झाडे उन्मळून पडल्यामुळे ठप्प झालेली तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभरानंतर सुरळीत झाली. दरम्यानच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.शहरातील बँक आॅफ इंडिया समोर सुहास राणे यांच्या चष्म्याच्या दुकानावर तसेच शारंगधर देसाई यांच्या कारवर वडाची फांदी कोसळली. त्याचबरोबर वीजेचे दोन खांबही मोडून पडले. शहरातील रुपाली वडापाव सेंटरवर झाड कोसळले.
तसेच संभाजी चौकातील दीपक माईणकर यांच्या इमारतीच्या छप्पराचे नुकसान झाले. तसेच अशोक रावराणे व बाळा माईणकर, शेखर नारकर यांच्या इमारतीच्या छप्पराचे सिमेंट पत्र फुटून मोठे नुकसान झाले.खांबाळे दंडावर घाडगे गोट फार्मनजीक झाड कोसळून फोंडा-वैभववाडी मार्गावरील वाहतूक अधार्तास खोळंबली होती. खांबाळे साळुंखेवाडी येथील शिवाजी कोर्लेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड आणि वीजवाहीन्या कोसळल्या.
तर प्रकाश दळवींच्या घराचे पत्रे फुटले. तसेच महेंद्र नाऊ बोडेकर यांच्या छप्पराचे नुकसान झाले. आचिर्णे धनगरवाड्यावरील रमेश सहदेव झोरे, करुळ भोयेडेवाडी येथील अरुण चव्हाण यांच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले.वीज पुरवठा ठप्प, तालुका अंधाराततालुक्याच्या अनेक भागात झाडे कोसळून घरांचे नुकसान तसेच वीजपुरवठा खंडित झाला. मात्र उशीरापर्यंत तहसीलमध्ये नोंद झाली नव्हती.
दरम्यान संपुर्ण तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वैभववाडी शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरणने दुरुस्ती हाती घेतली होती. मात्र उशिरापर्यंत पडणा-या पावसाचा अडथळा येत होता.
नावळेत दोघे जखमीवादळी पावसाच्या तडाख्याने नावळे येथील सूर्यकांत सावंत यांच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी सर्वजण घरातच होती. पण सुदैवाने मोठी हानी न होता छप्पराचा काही भाग अंगावर पडल्यामुळे सूर्यकांत आणि वसंत सावंत किरकोळ जखमी झाले.