कुडाळ : निर्मल भारत व स्वच्छ भारत योजनेंतर्गत कुडाळ तालुक्यातील पाट गावामध्ये २३ अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधणीसाठी निधी देऊन गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा गौफ्यस्फोट पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुबोध माधव यांनी केला.
वालावल तसेच तालुक्यातील इतर गावातही अशाच प्रकारे अपात्र लाभार्थ्यांना निधी देण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्राजक्ता प्रभू व कल्याणकर यांनी करीत शौचालय बांधणीसाठी अपात्र लाभार्थ्यांना निधी दिल्याने झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी या पंचायत समिती सदस्यांनी केली. शौचालय बांधणीच्या मुद्यावरून सभा गाजली.कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण तसेच सर्व पंचायत समिती सदस्य व खाते प्रमुख उपस्थित होते.या सभेत बोलताना पंचायत समिती सदस्य डॉ. माधव यांनी सांगितले की, निर्मल भारत अभियान व स्वच्छ भारत अभियान या योजनेंतर्गत पाट ग्रामपंचायतीने १०२ लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी निधी वाटप केला होता. या लाभार्थीपैकी २३ लाभार्थी हे अपात्र असताना ही त्यांना निधी वाटप करण्यात आला.
या २३ अपात्र लाभार्थीपैकी २० लाभार्थ्यांची या यादीमध्ये दोन वेळा तर एका लाभार्थ्याचे ३ वेळा नाव आले असून या ठिकाणी शौचालय बांधणीसाठी या २३ जणांना निधी देऊन या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप माधव यांनी करीत या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी. तसेच गैरव्यवहार झालेला निधी पुन्हा शासनाकडे जमा करण्यात यावा अशी जोरदार मागणी त्यांनी या सभेत केली.माधव यांनी शौचालयाचा मुद्दा उपस्थित करताच पंचायत समिती सदस्य प्राजक्ता प्रभू यांनी गौफ्यस्फोट केला की, वालावल येथे अगोदर बांधलेल्या शौचालयाची नव्याने रंगरंगोटी करून शौचालय नव्याने बांधले असे दाखवित दोन वेळा निधी लाटून गैरव्यवहार करण्यात आला आहे.
अजूनही काहीजण उघड्यावर शौचालयास जात असल्याचे सांगत येथील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच शितल कल्याणकर यांनीही अनेक ठिकाणी शौचालय बांधणी निधीत गैरव्यवहार झाला असल्याचे सांगितले.वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवरयावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव यांनी सांगितले की, तालुक्यातील वीज वितरण कंपनीकडून योग्य प्रकारे कामे केली जात नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त आपत्तीग्रस्त वीज वितरण विभाग आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे येथील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या गणेशचतुर्थी अगोदर तालुक्यातील सर्व वीज पुरवठा सुरळीत सुरू राहील, अशी ग्वाही वीज वितरणाच्या अधिकाऱ्याने गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थी अगोदरच्या सभेत येथील सभागृहात दिली होती. मात्र आता दुसरा गणेशोत्सव जवळ आला तरीही अनेक गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी काय काम करतात, असे सांगत वीज वितरणच्या अधिकाऱ्याना धारेवर धरले.