वैभववाडी : उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या विद्युतीकरणाचे काम तातडीने पूर्ण करुन त्या इमारतीचा वापर सुरु करावा. कुंभारवाडी येथे उभारण्यात आलेला ट्रान्सफार्मर तत्काळ कार्यान्वित करावा आणि माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत या विविध मागण्यांसाठी सरपंच एस. एम. बोबडे, उपसरपंच दशरथ दळवी, परशुराम दळवी, अमोल दळवी, उमर रमदुल, रत्नकांत बंदरकर, हमीद नाचरे, अलिबा बाबालाल नाचरे, यशवंत दळवी, विजय पांचाळ यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.उपोषण सुरु झाल्यानंतर तासाभरात वीज वितरणचे अधिकारी ग्रामस्थांशी चर्चेसाठी आले. त्यांनी कुंभारवाडीतील ट्रान्सफार्मरचे काम पूर्ण झाले आहे. विद्युत निरीक्षकांनी तपासणी केल्यानंतर तातडीने तो कार्यान्वित करण्यात येईल असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
ट्रान्सफार्मर कधी सुरु करणार ते सांगा, असे विचारताच स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून १२ सप्टेंबरला ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतील विद्युतीकरणाचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी ग्रामस्थांना दिले. तसे लेखी पत्रही बांधकामच्या उपअभियंत्यानी ग्रामस्थांना दिले.माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे भरतीच्या मागणी संदर्भात गटशिक्षणधिकारी मारुती थिटे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी ग्रामस्थांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा घडवून आणली. परंतु, लेखी आश्वासन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार शिक्षणधिकाऱ्यांनी शिक्षण विभागात ई-मेल पाठवित असल्याचे सांगितले. शिक्षणाअधिकाऱ्यांचे ते पत्र घेऊन सायकांळी उशिरा गटशिक्षणधिकारी थिटे पुन्हा उपोषणस्थळी गेले. मात्र, ते पत्र वाचल्यानतंर किती दिवसात भरती प्रकिया राबविणार याचा उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही पत्र स्विकारणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. त्यामुळे अधिकारी पुन्हा तहसीलदारांशी चर्चा करण्यासाठी गेले.दरम्यान जोपर्यंत शिक्षण विभाग रिक्त पदांच्या भरतीबाबत निश्चित कालावधीचे पत्र देत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरुच होते.