मालवण : मातीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तिंबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार एकवटले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल सभागृहात श्री गणेश मूर्तिकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक गजानन तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नारायण सावंत, सतीश कांबळी, दिलीप वेंगुर्लेकर, राधाकृष्ण नाईक, निलेश हडकर, बाळ वाईरकर, सुषमा मयेकर, दिलीप वायंगणकर, अरुण पालकर, गुरुनाथ नांदोडकर यांच्यासह जिल्ह्यातील मूर्तिकार उपस्थित होते. या बैठकीत प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी माती भरपूर प्रमाणात मिळते.बाजारात शाडू मातीसुद्धा मुबलक प्रमाणात मिळते. असे असताना पीओपीच्या मूर्ती बनविणे चुकीचे आहे. पेण, पनवेल, कोल्हापूर येथून या मूर्ती आणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकल्या जातात. आंबे मुंबईला घेऊन जाणाऱ्या वाहनातून येताना कमी भाडे आकारून मूर्ती आणल्या जातात.