मालवण : आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची सहानुभूती मिळण्यासाठी पुतना-मावशीचे दिखाऊ प्रेम दाखवत असून मच्छिमारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या आमदार नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी दिले आहे.मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केणी यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यास स्वाभिमानचे अध्यक्ष नारायण राणे सक्षम आहेत. मच्छिमारांचा धगधगता संघर्ष थंड झाल्यावर खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची भेट घेतात. त्यांना मच्छिमारांचा पुळका असता तर आंदोलनानंतरचे पाच दिवस कुठे होते? असा सवालही केणी यांनी केला.
शिवसेनेकडून मच्छिमारांमध्ये नेहमीच संभ्रम पसरविला जातो. खासदार रत्नागिरीत पर्ससीनला पाठिंबा देतात आणि मालवणात पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे भासवतात. अनधिकृत मासेमारीविरोधात मच्छिमारांनी कायदा हातात घेतला तर सत्ताधाऱ्यांकडूनच त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. यावेळी स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत व छोटू सावजी उपस्थित होते.मंदार केणी म्हणाले, आघाडी सरकारने पर्ससीन मासेमारीचे परवाने देण्याचे बंद केले होते. मात्र युती शासनाच्या काळात परवाने देण्याचे सुरू केल्याने मच्छिमारांची आंदोलने पुन्हा संघर्षमय झाली. मालवणातील संघर्ष प्रकरणाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना पोलीस अधीक्षकांनी अटक करून खंडणीचे गुन्हे दाखल केले.
या प्रकारानंतर मच्छिमार बांधवांनी नारायण राणे यांना हाक देताच त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याने मच्छिमारांची धरपकड मोहीम बंद झाली. एलईडी नौकांवर कारवाई होण्यासाठी आम्ही वकीलपत्र घालून एलईडी नौकांची छायाचित्रे दिली असून आमचा लढा एलईडी मासेमारीविरोधात असून पक्ष कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे केणी यांनी स्पष्ट केले.पोलिसांच्या धरपकड मोहिमेत महेश देसाई यांना नारायण राणे यांच्या बंगल्यासमोरून ताब्यात घेण्यात आले. यावेळी देसाई यांच्या आईने राणे यांच्याकडे विनवणी केली. त्यावेळी राणे यांनी देसाई हे शिवसैनिक आहेत, असा भेदभाव केला नाही. त्यांना अटक करू नये, अशा सूचना पोलिसांना देत त्यांना पोलीस कोठडीपासून सोडविले.
देसाई जर शिवसैनिक असतील तर ते राणेंच्या बंगल्याबाहेर काय करीत होते ? असा सवाल करताना शिवसेनेचे शहर प्रमुख बाबी जोगी यांनी देसाई यांचे हमीपत्र दिल्याने त्यांना सोडण्यात आले असे सांगत असतील तर पोलिसांच्या अटकेत असलेल्यांना अटक कशी झाली? बाबी जोगी यांनी त्यांना हमीपत्र का दिले नाही? असाही सवाल केणी यांनी उपस्थित केला.वातावरण गढूळ करण्याचा आमदारांचा डावमासळीची लूट रोखण्यासाठी मच्छिमारांची मागणी असलेल्या स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची स्थापना अद्याप करण्यात आलेली नाही. प्रशासकीय यंत्रणांकडून परराज्यातील नौकांना मासेमारी करण्यास मुभा दिली जात असल्याचा आरोप करताना परराज्यातील नौका पकडू शकलेले आमदार मत्स्य अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पर्ससीन नौकाधारकांची नावे सांगून स्थानिक मच्छिमारांमधील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका केणी यांनी केली. तर गोव्यातील राजकीय व्यक्तींनी आपल्या मंत्र्यांवर दबाव आणून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे मच्छिमारांना सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा राहिलेल्या नाहीत, असे अशोक सावंत यांनी सांगितले.