वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्याच्या समुद्रपट्टी भागात रविवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत समुद्राच्या भरतीचे पाणी उधाण भरतीप्रमाणे अकस्मात वाढले. त्याबरोबर समुद्राच्या लाटाही उसळल्या.
सागरी सुरक्षारक्षक असलेल्या वेंगुर्ले किनारपट्टीवरील सदस्यांनी याची माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस किनारपट्टीवर तत्काळ दाखल झाले.स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने ज्या ज्या बिचवर पर्यटन व रविवार सुटीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ७ फूट उंचीचा लाल रंगाचा बावटा लावून सागरी सुरक्षारक्षक त्या ठिकाणी थांबून या बावट्याच्या पुढे कोणीही जाऊ नये यासाठी कार्यरत राहिले.वेंगुर्लेचे पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल टी. टी. कोळेकर यांनीही रात्री ८ वाजेपर्यंत सागरीसुरक्षा रक्षकांसमवेत राहून सेवा बजावली.