वेंगुर्ले : शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह वेंगुर्लेत पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे पावसाने उसंत घेतली असली, तरी रविवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोसाट्याचा वारा व ढगांच्या गडगडाटामुळे समुद्रात उधाणसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका खाडीमध्ये सुरक्षितरित्या नांगरून ठेवल्या आहेत.अंदमानमध्ये मान्सून येऊन धडकल्यानंतर सिंधुदुर्गातील किनारपट्टीवर मान्सूनपूर्व हालचाली जाणवू लागल्या आहेत. गेले दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणाबरोबरच शनिवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या.वादळी वाºयांमुळे जोरदार लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत.
गेला महिनाभर पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे येथील समुद्र किनारा व बंदर परिसर गर्दीने फुलून गेला होता. पावसाची चाहूल लागल्याने पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. वादळी वाऱ्यांमुळे पर्यटकांसह मच्छिमारांनी समुद्र्रात न जाणे पसंत केले आहे.१ जूनपासून शासनाचा मच्छिमारी बंदीचा कालावधी सुरू होत असला तरी मान्सूनपूर्व हालचाली लक्षात घेता मच्छिमारांनी आपल्या होड्या किनाऱ्यांच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. तर काहींनी खाडी भागात नांगरून ठेवल्या आहेत. पावसामुळे समुद्र्राला उधाण आले असून जोरदार लाटा किनाऱ्यांला धडकत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्र्रापासून लांंबच रहाणे योग्य ठरणार आहे.अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे दोन महिने मासेमारी व्यवसाय बंद राहणार असून पावसात दैनंदिन रोजगारासाठी खाडीतील मासेमारी सुरू राहील. जून, जुलै या महिन्यात मत्स्यबीज निर्मिती होते. तसेच पाऊस व वादळी हवामानामुळे जीवितहानी होण्याचा धोका असल्याने शासनाकडून या कालावधीत मासेमारी बंदी असते.
पावसाच्या पाण्याने भिजून ट्रॉलर्सचे नुकसान होऊ नये या उद्देशाने माडाची झापे व प्लास्टिकच्या सहाय्याने ट्रॉलर्स किनाऱ्यांवर सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. मासेमारी बंद झाल्यानंतर मच्छिमार मिळालेल्या रिकाम्या वेळेचा दुरुपयोग न करता जुन्या होड्यांची डागडुजी, गरज असल्यास नवीन होड्यांची बांधणी, जाळ्यांचे विणकाम अशाप्रकारे भविष्यकाळासाठी लागणाऱ्या साधनांची निर्मिती व दुरुस्ती करताना दिसणार आहेत. मासेमारी बंदी कालावधी जवळ आल्याने मच्छिमारांनी आपल्या मासेमारीची मोठमोठी जाळी उन्हामध्ये सुकवून ती पुढील हंगामासाठी सुरक्षित ठेवली आहेत.