सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठही तालुकाध्यक्षांना सोबत घेऊन २६ सप्टेंबरपासून वैभववाडी येथून जिल्हाव्यापी बुथनिहाय दौऱ्याला सुरुवात केली जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.गेली १५ वर्षे भाजपामध्ये प्रामाणिक काम केले. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत असलेले समज-गैरसमज दूर झाल्यामुळे पक्षातील निलंबन मागे घेतले गेले.
भाजपामधून सुमारे एका वर्षाच्या कालावधीनंतर निलंबन मागे घेऊन बाबा मोंडकर याना जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील ९१७ बूथ सक्षमीकरणाची जबाबदारी देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मालवण येथील हॉटेल महाराजा येथे मोंडकर यांनी पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला उपाध्यक्षपदी संधी दिल्याबाबत पक्षाचे आभार मानले.
यावेळी महेश मांजरेकर, बबलू राऊत, धोंडी चिंदरकर, संतोष लुडबे, प्रकाश मेस्त्री, संतोष गावकर, उल्हास तांडेल, दादा वाघ, संदीप शिरोडकर, आबा पोखरणकर, रश्मी लुडबे, अवी सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील वनसंज्ञा, आकारीपड, देवस्थान इनाम, पुनवर्सन आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भविष्यात शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करून उभारली घरे नव्या शासन निर्णयानुसार अधिकृत करून जिल्ह्यातील गरीब जनतेला न्याय मिळवून देताना भाजपच्या संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे मोंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कायद्याची अंमलबजावणी करून घेऊ!ज्ञानेश देऊलकर यांनी संपूर्ण आयुष्य मच्छिमार समाजासाठी पणाला लावले. त्याप्रमाणे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर शासन निर्णय पारित केले. मच्छिमार व स्थानिक पर्यटन व्यवसायासाठी धोरण निश्चित केले.
भाजपा मच्छिमार नेते देऊलकर यांच्या कार्यावर काम करत असून पर्ससीन मासेमारीबाबत शासनाने काढलेल्या अध्यादेशांची अंमलबजावणी मत्स्य विभागाकडून करून घेतली जाईल. आमचा पर्ससीन मासेमारीला विरोध असल्यामुळे आमच्या सरकारने बनविलेल्या कायद्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुजोर अधिकाऱ्यांना जागा दाखवून देऊ, असाही इशारा मोंडकर यांनी दिला.