वेंगुर्ले : वेंगुर्ले-तुळस येथील ग्रामदैवत श्री देव जैतिराच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, मुंबई येथील भक्तांनी उपस्थित राहत श्री जैतिराचे दर्शन घेतले.दक्षिण कोकणातील श्री देव जैतीर हे जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. या देवाचा वार्षिक उत्सव म्हणजे तुळस गावाला मोठी पर्वणीच असते.
प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवारी जैतीर उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. ठिकठिकाणच्या भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. दुपारी २ नंतर भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला.मंदिर परिसर नारळ, केळी, मिठाई, खेळणी आदींच्या दुकानांनी गजबजून गेला होता. पावसाळी शेतीपूर्वी जैतीर उत्सव असल्याने या उत्सवाला शेतीची अवजारे विक्रीसाठी दाखल झाली होती.यात प्रामुख्याने नांगर, जू, प्लास्टिक, कांबळी आदींचा समावेश होता. शेतकरी मोठ्या प्रमाणावर या वस्तू खरेदी करताना दिसत होते. जैतिरोत्सवाची सांगता कवळासाने होणार आहे.