सावंतवाडी : येथील गांधी चौकात गटार तुंबल्याने पावसाचे पाणी नजीकच्या पोकळे यांच्या दुकान परिसरात शिरले. त्यामुळे त्या ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली. अखेर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्या ठिकाणी पाहणी करीत आपत्कालीन यंत्रणेद्वारे गटार खोदून पाण्याचा मार्ग खुला के ला. हे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.सावंतवाडीत गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, गांधी चौक परिसरात सोनारआळीच्या दिशेने प्लास्टिक बाटल्या, पिशव्या व इतर गाळाने गटार तुंबल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बंद झाला व पावसाचे पाणी गटाराद्वारे न जाता तेथील पोकळे यांच्या दुकान परिसरात शिरले. त्यामुळे दुकान परिसरात पाणी साचून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.
याची माहिती नगराध्यक्ष साळगावकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी करून नगरपालिकेच्या आपत्कालीन पथकाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने गटाराची खोदाई करून आतील गाळ बाहेर काढून गटाराचे पाणी सोडविले.
पाण्याचे प्रमाण लक्षात घेता काही काळ पंपाद्वारे पाणी बाहेर काढण्यात आले. त्यामुळे संपूर्ण गांधी चौक परिसरात पाणी पसरून रस्ता चिखलमय झाला होता. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, हा गटार पुरातन असून त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती आनंद नेवगी यांनी दिली. भर पावसात उशिरापर्यंत गटाराचे पाणी सोडविण्याचे प्रयत्न नगरपालिकेचे कर्मचारी करीत होते.काम थांबविलेगांधीचौक परिसरात ज्या ठिकाणी गटार तुंबले त्याची खोदाई करून पालिके ने तत्काळ काम हाती घेतले. मात्र आतमध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिक असल्याने रात्री आठ वाजता हे दुरूस्तीचे काम थांबविण्यात आले. शुक्रवारी ते पुन्हा करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या दुष्परिणामाचे हे उदाहरण असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.