मालवण : मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. समुद्रात लाटांची उंची वाढली असून किनारपट्टीवर वाऱ्यांनीही जोर धरला आहे.दरम्यान, बंदर विभागाने धोक्याचा इशारा दर्शविणारा दोन नंबरचा बावटा मालवण बंदरात लावला आहे. तर मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये अशा खबरदारीच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
एकूणच सिंधुदुर्ग किनारपट्टीवर येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, याचा परिणाम सागरी पर्यटनावर झाला असून सागरी पर्यटन ठप्प झाले आहे.भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून शुक्रवारी दुपारी १२ वाजता वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मालवण ते वसई या किनाऱ्यांवर ०३ ते ०३.२ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेला आहे. याबाबतच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सिंधुदुर्ग यांनी तालुका पातळीवर दिल्या आहेत.अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्यामुळे मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. वातावरण असेच पोषक राहिल्यास २९ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर आठ दिवसांत मान्सून गोवा व सिंधुदुर्गात धडक देईल. अशी माहिती हवामान तज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी दिली.मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम मालवण किनारपट्टीवर झाला आहे. समुद्रात लाटांची उंची वाढली असून किनारपट्टीवर वाऱ्यांनीही जोर धरला आहे.