कणकवली : सिंधुदुर्गात आलेले मुंबईकर चाकरमानी परतीच्या मार्गावर असून, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच्या सर्व गाड्या रेल्वे प्रवाशांनी भरून जात आहेत. रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसत आहे.
सुटीचे दिवस संपत आल्याने व शाळा सुरू होण्यास काही दिवस राहिल्याने मुंबईकर चाकरमानी मुंबईकडे रवाना होत आहेत. तसेच पुढील प्रवासाची तिकीटे काढण्यासाठी रेल्वे स्थानकात गर्दी वाढत आहे.सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांचा विचार करता सावंतवाडी रेल्वे स्थानकासह कुडाळ, कणकवली, वैभववाडी आदी रेल्वे स्थानकांवर मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आरक्षण फुल्ल झाल्याने जनरल डब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
अक्षरश: चेंगराचेंगरी होत आहे. सायंकाळी मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या गाडीचा प्रवास तर जीवघेणा म्हणावा लागेल. रत्नागिरी, खेड, चिपळूणमध्ये तर या गाडीच्या जनरल डब्यात पाय ठेवायला सध्या जागा मिळत नाही. कारण ही गाडी वेळेत मुंबईला पोहोचते.
वेळ अचूक असल्याने तसेच मुंबईच्या दिशेने जाण्याची वेळ योग्यप्रकारे असल्याने मुंबईकर चाकरमानी या गाडीला पसंती देतात. गोव्यावरून ही गाडी सुटते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा जास्त लोंढा या गाडीतच असतो.कोकणकन्यासारखीच योग्य वेळेत पोहोचणारी गाडी कोकण रेल्वे प्रशासनाने सोडणे गरजेचे आहे. तरच यावर काहीतरी उपाय होईल. सध्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्पे्रस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्पे्रस या चाकरमान्यांनी तुडुंब भरून मुंबईच्या दिशेने जातात.कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना, इमर्जन्सी फोन सुविधा सुरू केली आहे. आपत्कालीन कक्ष सुरू केले आहेत. पण रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर उपाययोजना आखणे गरजेचे आहे.कोकण रेल्वेच्या कुठल्याही गाडीचे उत्सव कालावधीतील तिकीट काढायचे म्हटल्यास वेटींग लिस्टमध्येच मिळते. तीन महिने अगोदर रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे ज्या प्रवाशांना आरक्षण तिकीट मिळत नाही, त्यांना जनरल डब्याचाच आश्रय घेऊन प्रवास करावा लागतो.त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन कोकणकन्यासारखी पर्यायी गाडी सोडण्याच्या विचारात आहे.त्यामुळे या कोकणकन्या गाडीतील गर्दी कमी होऊ शकते. त्यामुळे यावर लवकर उपाययोजना केल्यास या गाडीतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कमी होतील. त्याचप्रमाणे दादर-सावंतवाडी गाडीतही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यातील प्रवासी वर्ग प्रवास करताना हैराण होतो.
दिवाळी हंगाम असो किंवा मे महिना असो किंवा गणपती उत्सव असो, कोणत्याही सिझनमध्ये या गाड्यांतून प्रवास केल्यास गर्दी अफाटच असते. या कालावधीमध्ये प्रवाशांना गर्दीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे यावर उपायोजना करणे कोकण रेल्वे प्रशासनासाठी गरजेचे बनले आहे.सुखकर प्रवास द्यासध्या कोकण रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास देता यावा, रेल्वे स्थानकावर चांगल्या सुविधा देता याव्यात, त्याचप्रमाणे बचतगट स्टॉल कोकणातील उत्पादनाला प्राधान्य देणे या दृष्टीने उपाययोजना आखताना दिसते. याचा फायदा कोकणवासीयांना होईलच. पण वाढत्या रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास देण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.