कणकवली : आशा वर्कर्सना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता दुप्पटीने वाढवण्याच्या प्रधानमंत्री यांच्या घोषणेचे स्वागत सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन करीत आहे. आशा वर्कर्सनी सातत्याने दिलेल्या सेवांना त्यांच्या भाषणातून दिलेली मान्यता आणि त्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात केलेली वाढ म्हणजे सीटूच्या नेतृत्वाखाली देशातील आशांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्याचाच परिपाक आहे.
मोदी सरकारने ४५ व्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार सर्व योजना कर्मचाऱ्यांना कर्मचारी म्हणून मान्यता व त्यांना १८ हजार किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि निवृत्तीवतन लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही व ठाम मागणी आम्ही करत आहोत.पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आशा वर्कर्सच्या मुलभूत प्रश्नांना हात न घालता, मोदींनी केलेली ही घोषणा केवळ आशांचे विविध राज्यांमधील निदर्शने, धरणे, मोर्चे, जेलभरो इ. लढे आणि पाच सप्टेंबरला पार पडलेल्या मजदूर किसान संघर्ष रॅलीचाच परिणाम आहे.आशा वर्कर्ससाठी जाहीर केलेल्या विमा योजना ह्या आधीच अस्तित्वात असलेल्या सरकारी योजना आहेत. त्यात नवीन काहीच नाही. सरकारच्या आशा वर्कर्स बाबतच्या या तुकड्या तुकड्याने मोल द्यायच्या तथाकथिक दयाभावनेच्या वृत्तीचा आशा युनियन तीव्र निषेध करत आहे. आणि जोपर्यंत त्यांना नियमीत कर्मचाऱ्यांचे अधिकार व लाभ मिळत नाहीत, तोपर्यंत त्यांचे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा देत आहे.तसेच राज्यस्तरावर सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याशी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच मंत्रालयात झाली. त्या सभेत खालील चर्चा झाली. त्यात सध्या भारतातील ज्या १४ राज्यांत आशांना ठराविक वेतन मिळत आहे. त्याबाबत माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.ग्रामीण व शहरी भागातील आशांच्या कामाचा मोबदला दुप्पटीने व तिप्पटीने वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या सभेत घेतला जाईल. मासिक, त्रैवार्षिक व इतर सर्व बैठकीच्या भत्त्यात भरीव वाढ करणार, आरोग्य सर्व्हेसाठी दररोज २० घराचा सर्व्हे केल्यास प्रतिदिन ७५ भत्ता देण्यात येईल, आशांना विनामोबदला कोणतीही कामे दिली जाणार नाहीत, इतर सर्व सजिस्टर ऐवजी एकच डायरी या महिन्यापासून दिली जाईल, गटप्रवर्तकांना स्कूटर व प्रतिकिमी पेट्रोल भत्ता व दैनंदिन भत्ता वाढीबाबत चर्चा झाली. तसेच आशा व गटप्रवर्तकाच्या सामाजिक सुरक्षाबाबत ठोस प्रस्ताव संघटनेने दिला.त्यांचे आरोग्य, आजारपण बाळंतपण व मुलांना शिक्षण, गटप्रवर्तकांना लॅपटॉप, नवीन सॉफ्टवेअर, आशांना सायकल याबाबत प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीस सीटूचे कॉ. विवेक मॉटेंंरो, कॉ. सलीम पटेल, कॉ. आनंदी अवघडे, कॉ. प्रिती मेश्राम, कॉ. साठे व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.केंद्रीय आशा वर्कर्स समन्वय समितीच्या समन्वयक कॉ. रजना निरला यांनी सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आवाहन केले आहे की, आपल्या बऱ्यांच काळ थकित असलेल्या न्याय मागण्यांसाठी, भविष्यात होणाऱ्या सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांंच्या सार्वत्रिक संपासहित आगामी सर्व लढ्यात मोठ्या ताकदीनिशी उतरण्यासाठी सज्ज रहावे. तसेच पुढे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आशा व गटप्रवर्तक यांनी येऊन पुढे होणाऱ्या सर्व आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व सीटूचे हात बळकट करावे असे आवाहन सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा अर्चना धुरी, खजिनदार निलिमा लाड व सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी केले आहे.