सिंधुदुर्ग : पत्नीला चांगले आरोग्य मिळावे, तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, यासाठी कुडाळ-गवळदेव मंदिर येथे पुरुषांनी वडाची पूजा करत वडाला सात फेरे मारून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. सलग सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.पतीला चांगले आरोग्य मिळावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा याकरिता दरवर्षी महिला वडाची पूजा व वडाला सात फेऱ्या मारून वटपौर्णिमा सण साजरा करतात. यादिवशी महिला उपवासही करतात. संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. कुडाळ येथे मात्र गेल्या सात वर्षापासून एक वेगळी संकल्पना राबविली जात आहे. येथील पुरूष वडाला सात फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करतात.पत्नी आपल्या पतीसाठी अनेक त्याग करते, तिच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी होतो. त्यामुळे पत्नीचे आरोग्य चांगले रहावे व जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, याकरिता पतीदेव कुडाळ-गवळदेव मंदिर येथील वडाची पूजा करतात.यावर्षी उमेश गाळवणकर यांच्यासह राजन नाईक, प्रा. अरूण मर्गज, परेश धावडे, किरण करंदीकर, प्रीतम वालावलकर, प्रसाद परब, प्रसाद कानडे, भूषण बाके्र, वासुदेव माणगावकर, राजन हरमलकर यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.गाळवणकर यांच्या संकल्पनेला प्रतिसादसंपूर्ण देशात पत्नीसाठी वडाची पूजा करण्याचा हा उपक्रम याच ठिकाणी सुरू झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी सात वर्षांपूर्वी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. दरवर्षी पुरूषांचा याला प्रतिसाद मिळत आहे.