कणकवली : कणकवली येथील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत दिडशे वर्षा पूर्वीचा ऐतिहासिक वटवृक्ष तोडण्यात आला. अनेकांनी या वटवृक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले होते. तरीदेखील हा वटवृक्ष तोडल्याने त्या वटवृक्षाचे जतन करण्याची भुमिका आम्ही घेतली आहे.
स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्या माध्यमातुन १ हजार रोपे त्या वटवृक्षाची तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या ऐतिहासिक वटवृक्षाचे जतन करुन समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचे काम आम्ही करत असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.वागदे येथील वृक्षवल्ली रोपवाटीका येथे गुरुवारी त्या वटवृक्षाच्या फांद्याची विधीवत पुजा करुन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते रोपवाटीकेच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सायली सावंत, पंचायत समीती सदस्य मिलिंद मेस्त्री, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे, व्ही.के.सावंत, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, मंगेश सावंत आदी नागरिक व पत्रकार उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, कणकवली शहरातील अनेकांच्या आठवणी जागविणारा हा सह्याद्री हॉटेल समोरील वटवृक्ष ऐतिहासीक होता. काही नेत्यांनी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन हा वटवृक्ष वाचविण्यात येईल तर काहींनी थेट पक्षप्रमुखांना त्या वटवृक्ष वाचविण्याच्या विषयात आणले होते. त्यापलिकडे जावून स्नेहसिंधुच्या पुढाकाराने रोपवाटिका करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ हजार वटवृक्ष या वटवृक्षाचे तयार होतील.
विधीवत पुजा करुन वटवृक्षाच्या संवर्धनासाठी आम्ही काम करत आहोत. या निर्माण होणाऱ्या वडाच्या सावलीमधुन जनतेच्या भावना राखल्या जातील. सर्वसामान्यांच्या विचारांचा या रोपांच्या माध्यमातून आम्ही सन्मान करत असल्याचे सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमात सावंतवाडी पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी व जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल भगवान लोके यांचा स्नेहसिंधुच्यावतीने वृक्ष देवुन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.