सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत राज्यसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन व नवीन पाच योजनांचा शुभारंभ नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, पद्मश्री डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक मंडळ आदी उपस्थित होते.डी. वाय. पाटील साखर कारखान्याला प्रारंभ करताना एकही राष्ट्रीय बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा केला. आता त्याच राष्ट्रीय बँका आमच्या कारखान्याला रेड कार्पेट घालायला तयार झाल्या आहेत. मात्र, आम्ही जिल्हा बँकेलाच प्राधान्य देणार आहोत. असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकांना जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी नारायण राणे यांनी दिल्लीत पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.जिल्हा बँकेच्या नवीन पाच योजना जाहीरजिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधून नावीन्यपूर्ण अशा पाच योजना जाहीर करण्यात आल्या. या योजनांमध्ये उद्योग व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देणे, पडीक जमिनीवर काजू व बांबू लागवडीसाठी आठ टक्क्यांपर्यंत कर्ज देणे, भाग्यलक्ष्मी वासरू संगोपन करणे, धनलक्ष्मी कुक्कुटपालन योजनेंतर्गत महिलांना पंधरा हजारांपर्यत कर्ज देणे आणि रिक्षा खरेदीसाठी विनातारण पतपुरवठा करणे अशा पाच योजना सुरू करण्यात आल्या. या योजनांच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.