तळेरे : कणकवली तालुक्यातील डाटा आॅपरेटर काम करत असूनही त्यांना अल्प मानधन तर काहींना मानधनच मिळत नसल्याने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी ७ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. याबाबतचे लेखी निवेदन सबंधित विभागाला तालुक्यातील सर्व डाटा आॅपरेटर यांनी दिले.यापूर्वी नियमित मानधन मिळण्याबाबतचे लेखी निवेदन विविध अधिकारी आणि प्रतिनिधींना देण्यात आले होते. त्यांच्याकडून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या आश्वासनापलिकडे काहीच मिळालेले नाही. यामुळे गणेश चतुर्थीच्या तोंडावर डाटा आॅपरेटर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांना नियमित काम करूनही काही केंद्र चालकांचे मानधन कोणतेही कारण न सांगता कमी देण्यात येते तर काही केंद्र चालकांना तेही देण्यात येत नाही.महाराष्ट्र शासन राज्य मंत्री मंडळाच्या २० जून २०१८ ला झालेल्या बैठकीमध्ये केंद्र चालकांचे मानधन ३० जून २०१८ पर्यंत अदा करावे, असे निर्देश आहेत. परंतु, मानधन अद्याप मिळालेले नाही, याबाबत वारंवार प्रशासनाच्या व सबंधित कंपनीला विचारले असता वेळोवेळी टाळाटाळ केली जात आहे. अशा परिस्थितीमुळे गणेश चतुर्थीच्या तोंडावर आर्थिक पिळवणूक होऊन अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
या संबंधितांच्या निष्क्रीयतेमुळे आॅपरेटरवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीच्या आज्ञावलीच्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये व इ-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये ग्रामपंचायत पेपरलेस व्हाव्यात, यासाठी तालुक्यातील सर्व केंद्र चालक चांगले काम करीत आहेत.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या केंद्र चालकांना मानधनच मिळालेले नाही. गणेशचतुर्थी, दिवाळी सणांनाही मानधन मिळत नाही. अशावेळी ग्रामपंचायतचे कोणतेही काम राहिल्यास त्याला कोणीही आपले सरकार सेवा केंद्र चालक जबाबदार असणार नाही. त्याला फक्त सीएससी एसपीव्ही इ गव्हर्नस कंपनी जबाबदार असेल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.