मालवण ,दि. ०६ : पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येणाऱ्या ओहोटीच्या परिणामामुळे मालवण बंदरजेटी येथे पाण्याची पातळी कमी झाल्याचा फटका सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाच्या प्रवासी होड्यांना बसला. ओहोटीमुळे जेटीसमोर होड्या न लागल्याने शेकडो पर्यटकांना शनिवारी सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीअभावी माघारी परतावे लागले.मालवणात दोन दिवसांच्या सलग सुटीमुळे पर्यटकांचा ओघ शुक्रवारपासून वाढला आहे. मालवणात आलेले पर्यटक सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाबरोबर जलक्रीडा प्रकारांनाही पसंती देत आहेत. किल्ला दर्शनासाठी बंदर जेटी येथून होड्या सोडण्यात येतात.
शनिवारी आलेल्या ओहोटीमुळे बंदरजेटी किनारी समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जेटीपर्यंत होड्या येणे कठीण बनले. त्यामुळे शेकडो पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही.
दर महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच एकादशी ते संकष्टी आणि अमावास्येला एकादशी ते चतुर्दशी या चार दिवसांच्या कालावधीत समुद्राला आलेल्या ओहोटीमुळे बंदर जेटीजवळ पाण्याची पातळी घटल्याने किल्ला प्रवासी होड्या जेटीला लागत नाहीत.बंदर विभागाचा दुर्लक्षओहोटीचा मोठा फटका होडी व्यावसायिकांना बसतो. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने मेरिटाईम बोर्डाला सातत्याने बंदर जेटीजवळील गाळाचा उपसा करावा अशी मागणी केली होती. या मागणीकडे बंदर विभागाने सातत्याने दुर्लक्ष केला आहे, असा आरोप सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने केला आहे.