सिंधुदुर्गनगरी : कोपर्डीत १६ वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेला अत्याचार, दोषींना शिक्षा ठोठावण्यात होत असलेला वेळकाढूपणा, अॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा गैरवापर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण नसल्याने मराठा समाजातील मुलांची होणारी होरपळ या सगळ्या संतापाला रविवारी सकल मराठा क्रांती मूक मोर्चाने वाट करून दिली. सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे सिंधुदुगनगरीच्या पाच रणरागिणींच्या वक्तृत्वाच्या तोफा धडाडल्या. गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असलेला मराठा क्रांती मूक मोर्चा रविवारी सिंधुदुर्गनगरीत निघाला. ‘न भूतो, न भविष्यती’ निघालेल्या अशा या मोर्चाचे नेतृत्व केले सिंधुदुर्गच्या रणरागिणींनी. सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्गनगरीत दुपारी १२.३० वाजता या सिंधुदुर्गच्या पाच कन्यांनी आपल्या भाषणांतून मोर्चामागील उद्देश विशद केला. ऋतुजा मर्गज म्हणाली, कोपर्डीतील बहिणीच्या अखेरच्या श्वासाने आम्ही बांधलो गेलो. क्रांतीसाठी रक्ताचा इतिहास लागतो, असे म्हणतात. अशा किती बहिणी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या अपेक्षित आहे. मराठा समाज आतापर्यंत देणारा होता. आता मागणारा झालाय, पण ओरबाडणारा नाही. म्हणूनच हा मूक मोर्चा. गुणवत्ता नसेल तर खुशाल शिक्षणाची दारे बंद करा, पण आरक्षण नाही म्हणून आता माघार नाही. अॅट्रॉसिटीच्या कायद्यात खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांवर तीव्र कारवाई झालीच पाहिजे. त्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायला पाहिजे. रूपाली परब म्हणाली, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. रयतेचे राज्य स्थापन करून माणुसकीचा, समानतेचा भगवा झेंडा फडकावला त्या महाराष्ट्रात आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झालीच कशी? कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशांचा शिवरायांनी कडेलोट, शिरच्छेद केला असता. आता त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. आता रडायचं नाही, लढायचं. मागे हटायचं नाही, मराठा आरक्षण मिळवायचं. जिगिशा सावंत म्हणाली, लाखोंचे विक्रम मोडत जिल्ह्याजिल्ह्यांत निघणारे मराठ्यांचे मोर्चे कोणाला भीती घालण्यासाठी नाहीत. मोर्चात चालणारी माणसं फक्त शेतकऱ्यांची कोंडी फोडू मागताहेत. १६ वर्षांच्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या म्हणतोय आणि प्रत्येक गोष्टीत डावलल्या जाणाऱ्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणतोय. रसिका राणे म्हणाली, कोपर्डीच्या मुलीने आपल्याला एकत्र आणले. अॅट्रॉसिटी कायदा पूर्णपणे रद्द व्हावा, अशी मागणी नाही; पण त्याचा गैरवापर होता कामा नये, यासाठी तत्काळ सुधारणा करा. हा मूक मोर्चा असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. ही शांतता आहे तोपर्यंतच काय तो निर्णय घ्या. नाहीतर एकदा का वादळ पेटलं तर कळायचं नाही काय होईल ते. गायत्री सावंत म्हणाली, एकमेकांशी खूप भांडलो, आपसात खूप लढलो, अनेकांनी वापर केला, अनेकांचा प्रचार केला, अनेकांची ढाल झाली, अनेकांच्या मागे धावलो. आता हे घडणार नाही. मराठा बळी पडणार नाही. शब्दांना आग आली आहे. जिजाऊंची लेक जागी झाली आहे. आता मराठाच मराठ्यांना वाचवेल, यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल, दाखवू पुन्हा जगाला, काय असतो धाक मराठा, एक मराठा : लाख मराठा. सिंधुदुर्गच्या या रणरागिणी कन्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन तसेच सूत्रसंचालनही समिधा पाताडे हिने केले. राष्ट्रगीताने या मूक मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गनगरीत धडाडली जिजाऊंच्या लेकींची तोफ
By admin | Published: October 24, 2016 12:09 AM