सिंधुदुर्गनगरी : एक रूपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता..! अंगणवाडी कर्मचारी सभेचा विजय असो..! मानधन नको वेतन हवे... आदी विविध गगणभेदी घोषणा देत हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यां चा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कामगार कायद्यात करण्यात येत असलेल्या बदलांना विरोध करणारे आणि आपल्या मागण्यांच्या निवेदन यावेळी शासनाला सादर करण्यात आले.अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यां नी ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शालिनी तारकर, दिपाली पठानी, सुरेखा भांडारकर, मंगला राणे, रोहिणी लाड,अर्चना गांधी, सुचिता पोळ, शीतल साळुंखे, माधवी ठाकुर, कांचन शेणई, कुंदना कावळे, गुलाब चव्हाण, सायली परब यांच्यासह हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध घोषणा देत येथील परिसर दणाणून सोडला.देशातील श्रमिक कर्मचाऱ्यांच्या मुलभुत अधिकारांमध्ये कपात करून कॉर्पोरेट आणि मालकांना सोयीच्या तरतुदी करून सरकार कामगार कायद्यात बदल घडवित आहे. याला विरोध करण्यासाठी भारतातील सर्व कामगार व कर्मचारी संघटना समन्वय समितीने ८ व ९ जानेवारी या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली होती. त्यानुसार या संपात राज्यातील अंगणवाडी कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या ८ व ९ जानेवारी या दोन दिवस बंद आहेत. दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाच्या सुरुवातीला विज वर्कस फेडरेशनचे प्रतिनिधी प्रदीप नेरूरकर आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी भेट देत पाठींबा दिला.या आहेत प्रमुख मागण्यामहिला बालकल्याण व एकात्मिक बाल विकास योजना नियमित करावी, कर्मचाºयांना मानधना ऐवजी वेतन द्यावे, बोनस व भविष्य निर्वाह निधी द्यावा, रिक्त पदे भरावीत, कंत्राटीकरण रद्द करावीत, आजारपणाची भर पगारी रजा द्यावी, पेंशन मिळावी, सेवानिवृत्तीचा लाभ निवृत्तीच्याच दिवशी देण्यात यावा, इमारत भाडे वाढवून मिळावे, टीएचआर बंद करून स्थानिक ताजा आहार देण्याची व्यवस्था करावी, अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया त्वरित सुरु करा.