सिंधुदुर्गनगरी : शाळाबाह्य मुले राहू नयेत यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तरी अद्यापही शाळाबाह्य मुले असल्याचे निष्पन्न होत आहे. राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकट्या कुडाळ तालुक्यात तब्बल ३० मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. त्यामुळे ही तपासणी मोहीम जसजशी पुढे जाईल तशी संपूर्ण जिल्ह्याची शाळाबाह्य मुलांची संख्या वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे.राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांना आपल्या प्रवासात काही शाळाबाह्य मुले आढळून आली. या नंतर त्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या पत्रात नंदकुमार यांनी १ आॅक्टोबर २०१५ च्या परिपत्रकाद्वारे स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांबाबत सविस्तर दिशादर्शक सूचना दिल्या आहेत.त्यानुसार गेल्या दोन वर्षांत या विषयावर काम केल्यावर अद्यापही काही जिल्ह्यातून मुले पालकांसोबत स्थलांतरित होत आहेत. अशा मुलांना नजिकच्या दैनंदिन शाळेत शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याचे निर्देश आहेत. मात्र, त्या प्रमाणे कार्यवाही झालेली नाही. असे लक्षात आले आहे.माझ्या निदर्शनास जे आले ते इतर लोकांच्या ध्यानात का आले नाही. ही बाब विचार करण्यासारखी आहे. यावरून शासन परिपत्रकानुसार काम झालेले नाही. तरी बांधकामे सुरु असलेली ठिकाणे, साखर कारखाना परिसर, विट भट्टी अशा ठिकाणी स्थलांतरित मुलांचा शोध घेणे, अशा मुलांची संपूर्ण पत्यासह गाव, तालुका निहाय यादी तयार करणे, या मुलांना नियमित दाखल करणे, ज्या जिल्ह्यातून ही मुले आली आहेत.
त्या ठिकाणच्या शाळेकडून शिक्षण हमीपत्र उपलब्ध करून घेणे आदी कामे करावित असे बजावले. तसेच संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या गटातील शाळाबाह्य मुलांचा आठवडाभरात शोध घ्यावा असे आदेश दिले आहेत. त्यानुसार केलेल्या कार्यवाहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकट्या कुडाळ तालुक्यात तब्बल ३० मुले शाळाबाह्य आढळली आहेत.एकत्रित गुण ग्राह्यनोव्हेंबर २0१७ मध्ये जिल्हा पातळीवर पर्यवेक्षीय यंत्रणेच्या बैठका घेण्यासाठी विविध जिल्ह्यांत दौरा केला असता मॉर्निग वॉकच्या वेळी पालकांसोबत अनेक स्थलांतरित मुले दिसून आली. यामध्ये कधीही शाळेत न गेलेली, जन्म दाखल्याअभावी शाळेत प्रवेश न मिळालेले, मध्येच शाळा सोडलेले, शिक्षण हमी कार्ड नसलेली मुले आढळून आली.