सावंतवाडी - चार दिवसापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात झालेल्या अन्नातून विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून शिक्षण विभागाला चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणातील सत्य बाहेर येईल अशी आशा पालकांना आहे.याबाबत दीपक जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
सांगेली येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना झालेल्या अन्नातून विषबाधा झाली होती.या विद्यालयात तब्बल 438 विद्यार्थी शिक्षण घेत असून यातील 150 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती याप्रकरणी जिल्हा प्रशासन व नवोदय समितीकडून सुरू असलेली चौकशी संशयास्पद आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाकडे त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावे व या प्रकरणाची एसआयटी अथवा समितीमार्फत चौकशी करून यातील सर्व दोषींवर कारवाई करून तिथे असलेल्या मुलांच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी उपाय योजना कराव्यात.असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यालय प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात यापूर्वी अनेकदा अनेक सरकारी, प्रशासकीय पातळीवर निवेदने देऊनही त्याची योग्य ती दखल जिल्हाधिकारी तथा नवोदय विद्यालयाचे अध्यक्षांनी घेतलेली नाही. असा आरोप करण्यात आला असून जिल्हाधिकार्यांवर कारवाई करण्यासोबतच सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत म्हणजे भविष्यातील धोका टाळला जाईल असे ही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ही तक्रार पालक दीपक जाधव, प्रवीण पाताडे, समाधान जठार, नीलेश गावकर, डॉ. वैभव आईर, गौरी गोवासी, श्रेया धावळे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून, त्याची दखल घेत मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश शिक्षण खात्याला दिले आहेत.त्यामुळे आतातरी या प्रकरणात पालकांना न्याय मिळेल अशी खात्री आहे.
बाल हक्क आयोगाकडे मागितली दादसांगेली नवोदय विद्यालयात घडलेल्या अन्न विषबाधा प्रकरणी पालकांनी बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. अशा गंभीर प्रकरणात प्रशासनाने केलेल्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त करताना आपण या स्वत: लक्ष घालू असे आश्वासन आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी दिले आहे.