सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रूग्णालयात नव्याने उद्घाटन झालेल्या परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग प्रशिक्षण केंद्र) इमारतीसह शंभर खाटांचे हॉस्पीटल वापराविना बंदच आहे. गुरांचा गोठा बनले आहे.जिल्हा रूग्णालयाअंतर्गत कोट्यवधी रूपये खर्च करून नव्याने शंभर खाटाचे सुसज्ज अशी हॉस्पीटलची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन दोन महिने उलटले तरी या इमारतीचा अद्याप वापर होत नाही. तसेच गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या परिचारीका नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच गाई- म्हैशींचा गोठा बनला आहे. या दोन्ही इमारतीची केवळ उद्घाटने झाली आहेत. अद्यापही या इमारती वापरात न आणल्याने कुत्रे, गाई, म्हैशी यांचा वावर वाढला आहे.जिल्ह्यात वैद्यकीय सेवेत नर्सिंग प्रशिक्षण ही आवश्यक बाब असल्याने शासनाने या इमारतीसाठी कोट्यवर्धी रूपये निधी दिला. या निधीतून या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींची उद्घाटनेही मोठ्या थाटामाटात झाली असली तरी या इमारती अद्यापही वापरात आलेल्या नाहीत. जिल्हा रूग्णालयाची प्रशस्त अशी इमारत आहे. शासनाकडून विविध आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. मात्र या रूग्णालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना सेवा देताना जिल्हा रूग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने जिल्हा रूग्णालयात आलेल्या रूग्णांना अन्य रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी तर प्रमुख डॉक्टर सुट्टीवर असतात. नव्याने नियुक्त झालेल्या डॉक्टरांवर जबाबदारी सोपवली जाते अशा सुट्टीच्या दिवशी तर प्रसुतीसाठी आलेल्या महिलेलाही उपचार मिळणे कठीण बनते तर गंभीर रूग्णाला सेवा कोण देणार? असा प्रश्न आहे. जिल्हा रूग्णालयाच्या केवळ कोट्यवधीच्या प्रशस्त इमारती उभारण्यात येत आहते. पण डॉक्टर आणि कर्मचारी आहेत कुठे? मग केवळ इमारती बांधून उपयोग काय? डॉक्टरच नसतील तर इमारती बांधून दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जनतेमध्ये संतापजिल्हा रूग्णालयात आलेल्या रूग्णांना दर्जेदार सेवा, अन्य सुविधा, स्वच्छता मिळत नाही. याबाबत अनेक तक्रारी झाल्या. पुरेसे डॉक्टर नाहीत. विविध मशनरी असूनही त्याचे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. कित्येक मशिन्स बंद पडल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा रूग्णालयात दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यादृष्टीने कारभार सुधारण्यापेक्षा केवळ इमारतींचे जंगल उभारण्याकडेच जिल्हा रूग्णालयाचे लक्ष केंद्रीय झाल्याचे दिसून येत नाही. दर्जेदार सेवा मिळत नसेल तर केवळ इमारती बांधून उपयोग काय? इमारतीची उद्घाटने करून इमारती बंद राहणार असतील तर शासनाच्या कोट्यवधी रूपये खर्च करून इमारती बांधण्यामागचे गौडबंगाल काय? असा संताप जनतेमधून व्यक्त होत आहे. या नव्याने बांधलेल्या इमारती म्हणजे एकप्रकारे गाई- म्हैशींचा गोठा बनला आहे. येथे गाई, म्हैशी, कुत्रे यांचाच रात्रंदिवस वावर सुरू झाला आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गनगरीतील परिचर्या महाविद्यालय वापराविना
By admin | Published: September 01, 2014 9:36 PM