कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने गेली 27 वर्ष नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने जीवंत ठेवली आहे. त्याचबरोबर नाट्यमहोत्सवात प्रायोगिक नाटके सादर करून सिंधुदुर्गची रसिकता समृद्ध केली आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काढले .कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 27 व्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी प्रसाद कांबळी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे , आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, अॅड.नारायण देसाई आदी उपस्थित होते.प्रसाद कांबळी म्हणाले, रंगभूमीच्या ऊर्जितावस्थेसाठी रसिकांचे पाठबळ महत्वाचे आहे. त्यासाठी प्रतिष्ठानसारख्या नाट्य संस्था भक्कम व्हायला हव्यात. सर्व रंगकर्मीनी जबाबदारीने काम करून रंगभूमीचे महत्त्व टिकवायला हवे आणि नवीन पिढी रंगभूमीवर यायला हवी. त्याअनुषंगाने यापुढे प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवात दरवर्षी एक व्यावसायिक नाटक सादर करण्याची जबाबदारी माझी असेल.मी सध्या नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. एका वर्षात आम्ही दोन नाट्यसंमेलने आयोजित केली. आता 100 व्या नाट्यसंमेलनात प्रतिष्ठानचा सहभाग महत्त्वाचा असेल. रंगभूमीविषयी इथली माणसं निष्ठेने काम करतात. कोकणातला माणूस चोखंदळ नाट्यरसिक आहे. मुंबईतील नाट्य चळवळ त्यांच्यामुळेच जिवंत राहिली आहे.
डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, कोकणी माणूस हा सगळ्याच कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. तरीही त्यात त्याचे नाटकावर जास्त प्रेम आहे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात नाटकाचे मोठे स्थान आहे. आचरेकर प्रतिष्ठानमुळे उत्तमोत्तम नाटके येथे पाहायला मिळाली.वामन पंडित म्हणाले, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानला जागा मिळवून देण्यात माजी जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आपल्या अधिकार्यासह नाट्यगृहासाठी ही आताची जागा शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या सारख्या चोखंदळ नाट्य रसिकांमुळे हा नाट्योत्सव 27 वर्षे चालू आहे. यापुढेही रसिकांचे असेच सहकार्य लाभावे.