कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडी चिरेखाण येथील जंगल परिसरात मानवी सांगाडा सापडला आहे. हा सांगाडा महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या ओमकार अशोक परब (२४) या युवकाचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबतची निश्चित माहिती वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मिळेल, असे कुडाळ पोलिसांनी सांगितले. तालुक्यातील नेरूर-वाघचौडी येथील ओमकार परब हा १२ जूनपासून बेपत्ता होता. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात १३ जून रोजी बेपत्ताची नोंद करण्यात आली होती. कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
शनिवारी सकाळी नेरूर येथील एक ग्रामस्थ उगवणा-या रानभाज्या व कनकीचे कोंब काढण्यासाठी वाघचौडी-चिरेखाण येथील जंगलमय भागात गेला होता. तेथे कुजका वास येऊ लागल्याने पुढे गेला असता एका झाडाच्या खाली मानवी सांगाडा दिसून आला. सांगाड्याच्या बाजूला जीन्स पँट, रेनकोट, चप्पल आदी वस्तू पडल्या होत्या. याबाबत नेरूर ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुडाळ पोलीस ठाण्याला माहिती दिली.
कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे सडून केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. बाजूला पडलेल्या जीन्स पँट, रेनकोट, चप्पल आदी वस्तूंमुळे हा सांगाडा पुरुषाचा असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, घटनास्थळी मिळालेले कपडे आणि चप्पल या वस्तू ओमकारच्याच असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे हा मृतदेह ओमकारचाच असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. नायलॉन दोरीमुळे गूढ वाढले मृतदेहाच्या बाजूला नायलॉनची दोरी मिळाली आहे. जर ओमकार याने आत्महत्या केली असेल, तर ती दोरी झाडाला किंवा त्याच्या गळ्याभोवती अडकलेली मिळाली पाहिजे होती. मात्र दोरी मृतदेहाच्या बाजूला मिळाल्याने गूढ वाढले आहे.