सिंधुदुर्ग (मालवण) - गोठणे येथे आचरेकर कुटुंबियांवर काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील २ सख्खी भावंडे नदीत बुडाली. मालवण येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटल्याने झालेल्या अपघातात दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांची बहीणही पाण्यात बुडाली होती मात्र ती सुदैवाने बचावली. गोठणे आचरेकर स्टॉप येथील गोठणे कोंड नदीत ११ च्या सुमारास अंघोळी साठी आले असता ही घटना घडली.
फायबर बोट उलटून ही दुर्घटना अशी माहिती मिळाली आहे. आचरेकर यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर नदी आहे. नेहमी मुले येथे आंघोळीला जात होती. मयत सुवर्णा दशरथ आचरेकर वय (२३), आकाश दशरथ आचरेकर वय (१९) तर दीपाली दशरथ आचरेकर (२२) हिला वाचवण्यात यश आले आहे. सदर घटने मुळे गोठणे गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, आचरेकर कुटुंबातील तीन भावंडे सकाळी कपडे धुण्यासाठी गेले होते. पात्रात असलेल्या एका फायबर बोटीमधून त्यांनी डोहात जाण्याचा प्रयत्न केला. पण बोट पलटी झाल्याने दोन भावंडे खोल डोहात बुडाली. दिपाली हिला पोहता येत असल्याने ती वाचली. तिने एका झुडपाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे कोणतीही सुविधा नसल्याने अडचणी येत आहेत.