कणकवली : उत्तरप्रदेश येथिल हाथरसमध्ये युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर त्या युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे खासदार माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. तर त्या पीडित युवतीवर पोलिसांनी रातोरात अंत्यसंस्कार केले. या घटनेच्या निषेधार्थ कणकवली तालुका काँग्रेस मार्फत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशीच केंद्रातील भाजपा सरकार व राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यात आला .तसेच केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी कृषी विषयक विधेयकाचाही यावेळी निषेध करण्यात आला .कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात शुक्रवारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच भाजपा सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले .
यावेळी केंद्रातील भाजप व उत्तरप्रदेश मधील योगी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या . भाजपा सरकार देशात दडपशाही राबवत असून , महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे . विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा आरोप कणकवली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी यावेळी केला .हाथरस येथे युवतीवर अत्याचार झाला असताना हे प्रकरण सरकार दडपू पाहत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला . यावेळी काँग्रेसचे वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर , निलेश मालंडकर , कणकवली तालुका सरचिटणीस प्रवीण वरूणकर , युवक तालुकाध्यक्ष निलेश तेली , संदीप कदम , अभिषेक मेस्त्री , संतोष टक्के आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.