मालवण : येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या गुजरातमधील सहा हायस्पीड नौकांना मिळालेल्या मासळीच्या पाचपट म्हणजेच २२ लाख ६८ हजार ९०५ रुपयांचा दंड तहसीलदार अजय पाटणे यांनी ठोठावला. हा दंड संबंधित नौकामालकांनी भरल्याने त्यांच्या नौका सोडून देण्यात आल्या असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय कार्यालयातून देण्यात आली.मालवण समुद्राच्या हद्दीत अवैधरित्या मासेमारी करताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने गुजरात येथील सहा नौका पकडल्या होत्या. १६ आॅक्टोबरला ही कारवाई करण्यात आली होती. या सर्व नौकांवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली होती. चार दिवस या मासळीचा लिलाव सुरू होता. यात म्हाकूल, बळा, राणा यासारख्या मासळीचा समावेश होता.यात चेतनभाई नरशीभाई कोतिया (रा. वेरावल गुजरात) यांच्या भौला राणू या नौकेवर ५६ हजार २५ रुपयांची मासळी आढळून आली होती. त्यामुळे त्यांना २ लाख ८० हजार रुपये १२५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कामजी रामजी ढालकी (रा. वेरावल गुजरात) यांच्या गंगासागर नौकेवर १ लाख २ हजार ७६६ रुपयांची मासळी आढळून आली होती.
त्यामुळे त्यांना ५ लाख १३ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मनसूख बाबूभाई भेन्सला (रा. वेरावल गुजरात) यांच्या रुद्रगंगा नौकेवर १ लाख ६ हजार ३७ रुपयांची मासळी आढळून आली. त्यामुळे त्यांना ५ लाख ३० हजार १९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.दंड भरल्यानंतर नौका दिल्या सोडूनराधासेन कृष्णचंद्र भेन्सला (रा. वेरावल गुजरात) यांच्या शशी भूषण या नौकेवर ५१ हजार ९५४ रुपयांची मासळी आढळून आली होती. त्यामुळे त्यांना २ लाख ५९ हजार ७७० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ईश्वर देवजी भेन्सला यांच्या श्री साई या नौकेवर ६३ हजार ३९७ रुपयांची मासळी आढळून आली. त्यामुळे त्यांना ३ लाख १६ हजार ९८५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
जयाबेन रमेशभाई फोफंडी (रा. वेरावल गुजरात) यांच्या भक्तीपूजा या नौकेवर ७३ हजार ६०१ रुपयांची मासळी आढळून आली. त्यामुळे त्यांना ३ लाख ६८ हजार ५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड भरल्यानंतर या सहाही नौका सोडून देण्यात आल्या.