चिपळूण : भारतात सुशिक्षित लोक भरपूर आहेत. पदव्या आहेत. पण कौशल्य असणारे कारागीर नाहीत. हा मूलभूत शिक्षणप्रणालीचा दोष आहे. यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहे. कौशल्याची मागणी वाढली. स्वत:च्या विकासाची मागणी वाढली आहे. यासाठी आवश्यक असणारी संधी या योजनेत आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली. कष्टाला सन्मान ही आजची गरज आहे. आपण कष्टाला सन्मान देण्याची सवय सोडली आहे म्हणून आपण मागे आहोत. आपली घडी विस्कटली आहे, ती आता बसवायला हवी. केंद्र सरकारने या योजनेला मुद्रा बँकेचा आधार दिला आहे. या बँकेतून कमी दराने कर्ज देण्यात येणार आहे. वेगळ्या पद्धतीने रोजगाराची संधी यातून चालून आली आहे. रोजगाराची आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही योजना आहे, तिचा लाभ घ्यावा, असे आवाहनही भंडारी यांनी केले. कोंढेच्या रिगल कॉलेज येथे आज गुरुवारी सकाळी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन भाजपचे प्रवक्ते भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रकाश गगनग्रास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह गंगाराम इदाते हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी अर्बन बँकेचे संचालक प्रशांत शिरगावकर, रिगलचे सचिव विनोद शिर्के, महेश सुर्वे, सुशील चव्हाण, राजा दळी, पोलीस पाटील दत्ताराम मेंगाणे, मिलिंद शिर्के, शिवाजी चव्हाण, केदार साठे, बापू काणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कौशल्य असणारी माणसं निर्माण व्हावीत : भंडारी
By admin | Published: June 18, 2015 9:44 PM