चिपळूण : सावित्रीबाई कन्या कल्याण योजनेअंतर्गत दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या ४ दाम्पत्यांचा खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा माधवी खताते यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची बैठक सोमवारी दुपारी झाली. यावेळी कोंढे येथील प्रतिक्षा माळी, पाचाड येथील अंकिता कानापडे, कळवंडे येथील श्वेता भोमे व निर्व्हाळ येथील श्वेता हेलेकर यांचा सत्कार रुग्ण कल्याणच्या अध्यक्षा माधवी खताते, सदस्य खरवतेचे सरपंच हरिश्चंद्र घाग, सुभाष कदम, अंगणवाडी पर्यवेक्षिका योजना गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. या दाम्पत्यांना प्रत्येकी ८ रूपयाचे किसान विकास पत्र भेट देण्यात आले. यावेळी उपसरपंच सुप्रिया महाडिक, आरोग्य सहाय्यक जाधव, कार्तिक जोशी, आरोग्य विस्तार अधिकारी अरूण लोकरे, केंद्रप्रमुख चिवेलकर उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले व अहवाल वाचन केले. या आरोग्य केंद्रात १०० टक्के कर्मचारी पदे भरलेली असल्याने आरोग्य विभागाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यानंतर जमाखर्चाला मंजुरी देण्यात आली. या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीचे प्रमाण वाढत असून, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच गर्भवती मातांची सोनोग्राफी व रक्त तपासणीसाठी लागणाऱ्या सुविधासाठी उपाययोजना करण्याचे सुचवण्यात आले. जानेवारी २०१५ अखेर येथे २५५ गरोदर मातांची नोंदणी झाली होती. या आरोग्य केंद्रात २४ मातांची प्रसुती झाली होती. तर २० गरोदर मातांना संदर्भसेवा देण्यात आली होती. या कार्यक्षेत्रात एकूण २०३ नवीन जन्म झाले, तर एका अभ्रकाचा मृत्यू झाला. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ५७ दारिद्रय रेषेखालील मातांना लाभ देण्यात आला. येथील लसीकरणाचे कामही चांगले असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. हिवताप नियंत्रणासाठी ४ हजार ५३० रक्तनमुने गोळा करण्यात आले. एकजण दूषित आढळला. क्षयरोगासाठी २०६ थुंकी नमुने तपासण्यात आले. त्यात १७ क्षयरोगी आढळले. ४९ जणांच्या मोतीबिंंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पल्स पोलिओचे ९२ टक्क काम पूर्ण झाले. जंतनाशक मोहीम जीवनसत्व अ, लेप्टोस्पायरोसिस, जलजन्य आजार सर्वेक्षण,लेप्रसी व टीबी इत्यादी कार्यक्रम येथे राबवले जात असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. परदेशी यांचा अध्यक्षा खताते यांनी सत्कार केला. लिपीक जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन यावेळी झाले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला बोअरवेल मारून मिळावी व दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली. अनेक कामे बांधकाम खाते आपल्याला विश्वासात न घेता परस्पर करीत असल्याने अध्यक्षा खताते यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
‘बेटी बचाओ’चा नारा
By admin | Published: March 10, 2015 9:39 PM