कणकवली : कणकवली शहरात संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुचाकींना रस्त्यावर फिरण्यास बंदी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसला आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात अजूनही नागरिक रस्त्यावर दिसून येत असले तरी दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र सर्वत्र शांतता पसरलेली दिसून येते.दरम्यान, पोलिसांकडून शुक्रवारीही संचारबंदी कडक करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी प्रशासनाने व्यापारी तसेच विक्रेते यांच्याशी चर्चा करून नियोजन केले आहे.त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी कमी होत आहे. सकाळी ८ ते ११ यावेळेत नागरिक बाजारपेठेत दिसत आहेत. मात्र, सकाळी ११ वाजल्यानंतर गर्दी ओसरून बाजारपेठेत शुकशुकाट पसरत आहे. दुपारी १२ वाजल्यानंतर उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने लोक घराबाहेर पडायला बघत नाहीत. मात्र, सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा लोकांचा फेरफटका सुरू होतो. तो कमी होणे आवश्यक आहे.
पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केल्याने आता गर्दी कमी झाली आहे. पण घराबाहेर पडण्याची संधी कधी मिळते असे अनेकांना झालेले पहायला मिळते. यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याला होईल. या भीतीने घराबाहेर न पडणाºयांची संख्या फारच कमी आहे. त्यापेक्षा पोलीस कारवाईची भीती बाळगून अनेक जण घरात बसत आहेत. मात्र, नागरिकांनी घरातच बसणे त्यांच्या व समाजाच्या सध्याच्या या काळात हिताचे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.भाजीपाला, दूध, कडधान्य आदी जीवनावश्यक साहित्य नागरिकांना घरपोच देण्याची सुविधा कणकवली शहरात उपलब्ध करण्यात आली आहे. आजूबाजूच्या गावातही अशाच प्रकारची सेवा हळूहळू देण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. पण उत्सुकतेपोटी बाजारात येणाऱ्या लोकांची काही कमी नाही. त्यांना आता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे.सतत गजबजणारे बसस्थानक सुने सुनेसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील बसस्थानक नेहमीच गजबजलेले असते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवासीच नसल्याने एसटीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कणकवली बसस्थानक प्रवासी व गाड्यांच्या अभावी सुने सुने झाले आहे.