सावंतवाडी : दोडामार्गमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अन्यायकारक गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्या, अन्यथा एकही एसटी डेपोतून बाहेर पडू दिली जाणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिल्यानंतर सावंतवाडी एसटी बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे बसस्थानक परिसरात तुरळक प्रवासी होते. दोडामार्गमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकाच्या अपुऱ्या कामावर आंदोलन छेडले होते. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी गुन्हे दाखल केले होते. यानंतर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा एसटी डेपोतून एकही बस सुटणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला होता. या इशाऱ्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते येथील माजी खासदार कार्यालयात एकत्र जमले होते. यामध्ये काँग्रेस नेते विकास सावंत, सभापती प्रमोद सावंत, मंदार नार्वेकर, सभापती अत्माराम पालेकर, माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, गुरू पेडणेकर, गुरू सावंत, दिलीप भालेकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, चित्रा भिसे, शिला सावंत, बेला पिंटो, वैष्णवी ठोंबरे आदींची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या आदेशाची प्रतीक्षा सुरू होती. दुपारी ३ च्या सुमारास राणे यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कणकवलीत केली. त्यानंतर सावंतवाडीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. नारायण राणेंच्या पाठीमागे ठामपणे कार्यकर्ते उभे असल्याचे दाखवून दिले आहे. (प्रतिनिधी) सावंतवाडी आगार : मोठा पोलीस बंदोबस्त काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी एस.टी. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक प्रविण चिचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत, अरूण जाधव, जयदीप कळेकर आदींसह एसआरपी पोलीस तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी असे मिळून शंभर ते दीडशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
बसस्थानकात तुरळक प्रवासी
By admin | Published: February 27, 2016 1:10 AM